विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा, वाचा काय आहेत उर्मिला यांच्या निवडीची कारणं?

साम टीव्ही
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. उर्मिला यांच्या निवडीची कारणं काय आहेत? वाचा सविस्तर -

राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त केल्या जाणाऱ्या 12 जागांसाठी महाविकास आघाडीनं नावं निश्चित केल्याचं समजतंय. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून आमदारकी दिली जाणार असल्याची चर्चा जोरात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: त्यांच्याशी चर्चा केल्याचं समजतंय. 

उर्मिला मातोंडकर यांनी 2019 साली काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या झंझावाती प्रचाराची त्यावेळी जोरदार चर्चाही झाली होती. मात्र, भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. कालांतरानं काँग्रेसमधील अंतर्गत वादाला कंटाळून त्या पक्षातून बाहेर पडल्या. 

अभिनेत्री कंगना राणावत हिने बॉलिवूडवर केलेल्या आरोपांना आणि मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्याला उर्मिला यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं. हीच बाब त्यांच्या पथ्यावर पडल्याची चर्चा आहे. शिवाय राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करण्यात येणारे सदस्य विविध क्षेत्रांतील असावेत, असा संकेत आहे. राज्यपाल आणि ठाकरे सरकारचे सध्याचे संबंध पाहता राज्य सरकारच्या यादीत विविध क्षेत्रातील मान्यवरांची नावं नसल्यास राज्यपालांकडून ही नावे फेटाळली जाऊ शकतात. त्यामुळेच महाविकास आघाडीने संभाव्य यादीत विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केल्याचं समजतंय. या सर्व बाबी लक्षात घेता उर्मिला मातोंडकर यांची विधान परिषदेतली एंट्री निश्चित मानली जातेय.


संबंधित बातम्या

Saam TV Live