मंदिर उघडण्यावरनं शिवसेना-एमआयएम आमनेसामने, वाचा काय घडलंय...

साम टीव्ही
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020
  •  
  • मंदिर उघडण्यावरनं शिवसेना-एमआयएम आमनेसामने
  • शिवसेना-एमआयएमच्या राड्यात मनसेचीही उडी
  • कोरोना वातावरणात औरंगाबादमध्ये सर्वपक्षीय स्टंटबाजी

बातमी आहे मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये रंगलेल्या राजकारणाची..इथलं खिडकाळेश्वर मंदिर उघडण्यावरून खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आमने सामने आले. तर या राजकीय वादात मनसेनं उडी घेतली त्यामुळे औरंगाबादमध्ये आज सर्वपक्षीय स्टंटबाजी पाहायला मिळाली. मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये आज मंदिर उघडण्यावरनं शिवसेना-मनसे आमनेसामने आले. विशेष म्हणजे या राड्यात मनसेनंही उडी घेतली.

विकास सोडून अस्मितेच्या मुद्द्यावर अनेक दशकं औरंगाबादचं राजकारण चालत आलंय. कोरोना संकटकाळात अस्मितेचं राजकारण बाजूला पडेल असं वाटलं होतं, पण मराठवाड्याच्या राजधानीतलं चित्र काही निराळच आहे. औरंगाबादमध्ये मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि एमआयएम आमनेसामने येताना दिसले.

त्याचं झालं असं की औरंगाबादचं खडकेश्वर मंदिर उघडण्यासाठी खासदार इमतियाज जलील यांनी आंदोलन करण्याची घोषणा केली. एमआयएमचे काही कार्यकर्ते खडकेश्वर मंदिर परिसरातही दाखल झाले.

एमआयएमचे कार्यकर्ते मंदिर परिसरात दाखल होताच हिंदुत्वाची ठेकेदार शिवसेना खवळली. माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे असे शिवसेनेचे नेते मंदिर परिसरात पोहचले. शिवसैनिकांच्या अचानक जमलेल्या गर्दीनं वातावरण तापलं. माजी खासदार खैरेंनी आपल्या शैलीत एमआयएमवर टीका केली.

मंदिर उघडण्यावरनं शिवसेना-एमआयएम आमनेसामने आले असताना मनसेची कार्यकर्ते मंदिर परिसरात दाखल झाले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक होताना दिसली.

औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. विकासाचं नामोनिशाण शोधावं लागतं. तरीही सत्ताधारी आणि विरोधात बसलेल्या राजकीय पक्षांना मंदिर-मशिद उघडण्यावरनंच स्टंटबाजी करावीशी वाटते, हे खरंच औरंगाबादकरांचं दुर्दैव म्हणावं लागेल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live