बेस्टच्या फिरत्या कॅंटीनमध्ये लवकरच शिवभोजन

विष्णू सोनवणे,सरकारनामा
गुरुवार, 30 जानेवारी 2020


राज्य सरकारने बेस्ट उपक्रमाच्या दोन फिरत्या कॅंटीनमध्ये शिवभोजन थाळी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन विशेष बसगाड्यांच्या मार्गाचा आराखडा तयार झाल्यानंतर काही दिवसांतच शिवभोजन सुरू होईल

 

मुंबई : राज्य सरकारने बेस्ट उपक्रमाच्या दोन फिरत्या कॅंटीनमध्ये शिवभोजन थाळी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन विशेष बसगाड्यांच्या मार्गाचा आराखडा तयार झाल्यानंतर काही दिवसांतच शिवभोजन सुरू होईल.

शिवभोजन थाळी योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या फिरत्या कॅंटीनमध्ये अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. सध्या बेस्टतर्फे काही ठिकाणी बसमधील फिरत्या कॅंटीनची सुविधा देण्यात आली आहे. या कॅंटीनमध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरांत खाद्यपदार्थ मिळतात. त्या धर्तीवर दोन विशेष बसमध्ये शिवभोजन थाळी योजना राबवली जाणार आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर त्यासाठी बेस्ट उपक्रमाने दोन बसगाड्यांची निवड केली आहे.

या दोन विशेष बस कोणत्या मार्गावर सुरू करायच्या, याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर बेस्ट उपक्रम राज्य सरकारपुढे सादरीकरण करेल. त्यानंतर या फिरत्या शिवभोजन कॅंटीनच्या मार्गाबाबत निर्णय होईल. या बसमध्ये दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत 75 ते 100 जणांना शिवभोजन थाळी देण्याचे नियोजन आहे. ही सेवा लवकरच सुरू होईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिली.

WebLink ::  Shivbhojan Thali Will be Available in Best Mobile Canteens


संबंधित बातम्या

Saam TV Live