शिवसेना गुजराती मतदारांना चुचकारतेय? जिलेबी, फाफडा, सेनेला देणार मतांचा आकडा?

साम टीव्ही
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021
  • शिवसेना गुजराती मतदारांना चुचकारतेय?
  • जिलेबी, फाफडा, सेनेला देणार मतांचा आकडा?
  • भाजपला दणका देण्यासाठी सेनेचं गुजराती कार्ड?

शिवसेना... मुख्यत: मराठी माणूस आणि हिंदुत्व हा शिवसेनेचा गाभा. पण शिवसेनेनं हल्लीच केलेला गुजराती मेळावा. आणि गुजराती गरबा. या कार्यक्रमांमुळे शिवसेनेचं गुजराती प्रेम उफाळून आलंय. पण, जिलेबी आणि फाफडा शिवसेनेचा मतांचा आकडा वाढवणार का?  वाचा सविस्तर...

घोषणा आसमंतात दणाणली आणि अखंड महाराष्ट्राच्या भुवया वर गेल्या. मराठी माणसांची बोटं आश्चर्याने तोंडात गेली आणि राजकीय विश्लषकांचे डोळे विस्फारले. कारण ही घोषणा दिली गेली, मराठीचा कैवार घेणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यात. हो तीच शिवसेना, जिच्या व्यासपीठावर मराठमोळ्या तुतारीचा निनाद घुमायचा. जिच्या जन्मामागेच मराठी माणसावरील अन्यायाच्या वेदनेचा हुंकार होता. पण शिवसेना आता कूस बदलतेय का? असा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. कारण शिवसेनेनं आता गुजराती मतदारांना जवळ घेण्याचे प्रयत्न केलेयत. मुंबईतील जोगेश्वरीत आयोजित केलेला गुजराती मेळावा हा त्याचा धडधडीत पुरावा. शिवसेनेनं असं का केलं असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, मंडळी. उत्तर अग्गदी सोप्पंय. कोणत्याही राजकीय नेत्याच्या किंवा पक्षाच्या भूमिकेत असा बदल घडण्यामागे जे कारण असतं, तेच कारण शिवसेनेच्या गुजराती मेळाव्यामागे आहे. मतदान. मतदान आणि मतदान. याच मतांसाठी शिवसेनेनं गुजराती मतदारांना साद घातलीय. फक्त मेळावा घेऊन शिवसेना थांबलेली नाही, तर आता शिवसेनेच्या झेंड्याखाली गरबाही खेळला जाणारेय. तोही गुजराती बांधवांसाठी.

या मेळाव्यात अनेक गुजराती मतदार उपस्थित होतेच, पण अनेकांनी शिवसेनेचं शिवबंधनही मनगटाला बांधून घेतलंय. आधीच शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हात मिळवून सत्तेची चूल मांडलीय. त्यातच आता मुंबईसह इतरही महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे, भाजपचा पारंपरिक मतदार समजल्या जाणाऱ्या गुजराती मतदारांकडे शिवसेनेचा डोळा गेला नाही तरच नवल.

अर्थात, शिवसेनेनं ही भूमिका आताच बदललीय असंही नाही, याआधीही उत्तरभारतीयांना जवळ घेण्यासाठी शिवसेनेने लाई चना महोत्सव आयोजित केला होता, अगदी हल्ली हल्लीही शिवसेनेची चौथी पिढी असलेल्या आदित्य ठाकरेंनी वरळीत लढताना गुजराती, कन्नड आणि दाक्षिणात्य भाषांमध्ये प्रचाराचे फलक लावले होते. त्यामुळे यावेळच्या शिवसेनेच्या गुजराती प्रेमाचं फारसं आश्चर्य वाटायला नको. मात्र, असं असलं तरी, गुजराती व्होटबँक फोडून भाजपच्या पायात पाय घालत स्वत:चा राजकीय पाया मजबूत करण्याचा शिवसेनेचा स्वार्थ लपून राहिलेला नाही. फक्त आता गुजराती जिलेबी, फाफडा, शिवसेनेला मतांचा आकडा देणार का? हे पाहाणं औत्सुक्याचं आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live