सेना भाजपचा तलाक.. पण २०१९ पर्यंत कुलिंग पिरिएड !!!

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 जानेवारी 2018

….आज वाघाने डरकाळी फोडलीच!
…..महाराष्ट्राला शिवसेनेचाच पर्याय?
…..गायीला मारणं पापच आहे!
…..थापा मारणं काय पुण्य आहे का?

मैत्रीच्या नाटकाची तिसरी घंटा !
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचं औचित्य साधत शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडली. या कार्यकारिणीची सर्वांनाच उत्सुकता होती. पण ही उत्सुकता सेनेतल्या कोणत्या नेत्याकडं कोणतं पद मिळेल, यापेक्षा यात कोणकोणते ठराव होणार, याची जास्त होती. याचं कारणही तसंच आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातल्या घरोब्याला गेल्या तीन- साडेतीन वर्षांपासून ग्रहण लागलंय. या ग्रहणात राज्याचं राजकारण काळोखात बुडून गेलंय.

घरात राहूनही शेजारी असल्यासारखं शिवसेनेचं वागणं भाजपला रुचेनासं झालंय. पण भाजप मोठ्‌या भावाच्या भूमिकेत गेल्यामुळं मौन बाळगून आहे. मोठा भाऊ म्हणून सामंजस्य दाखवण्याचं नाटक भाजप वठवत होता, कारण त्याला अचानक लहान झालेल्या छोट्‌या भावाला खिजवायची एकही संधी सोडायची नव्हती. अखेर मुहुर्त मिळालाच! पण तरीही आपणच समंजस आहोत, असा आव भाजपकडून आणला जात होता. या नाटकावर पडदा कोण टाकणार, याचीच उत्सुकता होती.

शिवसेनेनं यापूर्वी अनेकदा सत्तेवर लाथ मारण्याची भाषा वापरलीही होती. पण शरद पवारांनी म्हटल्याप्रमाणं शिवसेनेच्या पायाला बहुधा फेव्हिकॉल लागलं असावं, असं वाटत होतं. आताही परिस्थिती बदललीय, असं नाही. फेव्हिकॉल आहे, म्हणूनच भाजपबरोबरच्या घरोब्याला तलाक देण्याचा मुहूर्त 2019 चा निवडण्यात आलाय.

हे डराव डराव नाही!
2019 साठी जो ठराव केला गेला, तो माना हलवून केलेला नाही, तर मुठी आवळून केलेला आहे. त्यामुळं त्याला कोणीही हलक्‍यात घेऊ नये, असा इशारा पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी दिलाय. याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलंय. कारण आपल्याबरोबर दमलेले नाही, तर दमदार शिवसैनिक आहेत, त्यामुळंच कार्यकारिणीच्या ठरावांकडं कुणी दुर्लक्ष करु नये, असा इशारा उध्दव ठाकरेंनी दिलाय. नव्या कार्यकारिणीसमोर बोलताना नवनिर्वाचित पक्षप्रमुखांनी राज्याप्रमाणंच केंद्रातल्या सरकारवरही जोरदार टीकास्त्र सोडलं. राज्यातलं सध्याचं सरकार जाहिरातबाजीचं सरकार आहे. हे सरकार खाली खेचून इथं शिवशाही आणण्याचा निर्धार उध्दव ठाकरेंनी केलाय. राज्यसरकारवर टीका करतानाच मोदींनाही त्यांनी टार्गेट केलं. भारतात येणा-या प्रत्येक जागतिक नेत्याला अहमदाबादच का दाखवलं जातं? हा प्रांतवाद नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. गायीला मारणं जसं पाप आहे, तसं थापा मारणंही पापच आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलय.

छाती सिहांची आहे की… ???  
राज्यांतर्गत निवडणुकांमधे पाकिस्तानचा मुद्‌दा आणला जातो. त्या त्या राज्यातले विषय का येत नाहीत? पाकिस्तानचा विषय कुठल्याही निवडणुकात येतोच कसा? असे अवांतर विषय आणल्यामुळंच गुजरातमधे ही अवस्था झाली, तिथं आणखी एखादा प्रादेशिक पक्ष असता तर काय झालं असतं, हे सांगण्यासाठी तिस-या कोणाची गरज भासणार नाही, असंही उध्दव ठाकरे म्हणतात. गडकरी, चंद्रकांत पाटील यांच्यावर खरपूस टीका करतानाच त्यांनी मोदींच्या 56 इंची छातीवरही शरसंधान केलंय.

2019 पर्यंत देवेंद्रांना ”अभय”?
2019 ची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा आणि तसा ठराव राष्ट्रीय कार्यकारिणीत झाला तरी तोपर्यंत राज्यातली युतीचाही घटस्फोट झालाय की नाही, हे मात्र उध्दव ठाकरेंनी स्पष्ट केलेलं नाही. घटस्फोटाचा निर्णय देण्यापूर्वी कोर्ट जसं जोडप्यांना जसा कुलिंग पिरिएड देतं, तसंच काहीसं फडणवीसांचं आहे, असं समजयचं का? तसं असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी हा कुलिंग पिरिएड समजायचा का?

 


संबंधित बातम्या

Saam TV Live