"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 19 जानेवारी 2019

मुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा "ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचार करण्याचा हा रजतमार्ग किती फळतो ते पाहावे लागेल. बॉलिवूड, अंडरवर्ल्ड आणि शिवसेना या परदेशातून किंवा परकी नजरेतून मुंबईकडे पाहणाऱ्या अभ्यासकांच्या तीन आवडत्या गोष्टी. त्या रजतपटाचीच ही आधारकहाणी. भारताच्या विशाल पटावर राजकारण वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्‍त होते. कॉंग्रेस आणि गेल्या काही वर्षांत उदयाला आलेल्या भाजप या दोन ध्रुवांमध्ये असणारी प्रादेशिक पक्षांची मांदियाळी भलतीच चमकत असते.

मुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा "ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचार करण्याचा हा रजतमार्ग किती फळतो ते पाहावे लागेल. बॉलिवूड, अंडरवर्ल्ड आणि शिवसेना या परदेशातून किंवा परकी नजरेतून मुंबईकडे पाहणाऱ्या अभ्यासकांच्या तीन आवडत्या गोष्टी. त्या रजतपटाचीच ही आधारकहाणी. भारताच्या विशाल पटावर राजकारण वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्‍त होते. कॉंग्रेस आणि गेल्या काही वर्षांत उदयाला आलेल्या भाजप या दोन ध्रुवांमध्ये असणारी प्रादेशिक पक्षांची मांदियाळी भलतीच चमकत असते. शिवसेना हा त्यातला प्रकाशमान तारा. "मुंबई म्हणजे शिवसेना' हे समीकरण 80 च्या दशकात महाराष्ट्रभर पसरू लागले अन्‌ प्रादेशिकांच्या राजकारणात शिवसेनेने बघता बघता महत्त्वाचे स्थान पटकावले.

पानिपतातील पराभवाचे शल्य मनाशी बाळगणारा महाराष्ट्र सतत देशात आपले स्थान शोधत असतो. सर्व क्षेत्रांत अग्रेसर होण्याची भाषा बोलतो. मराठी माणसाची ही आस अचूक ओळखत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. ती स्वबळावर एकहाती सत्ता मिळवू शकली नाही, पण आजही शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणातील शक्‍ती आहे. शिवसेनेने आपल्या बाजूला राहावे यासाठी भाजप प्रयत्नरत आहे, तर मोदींना रोखण्याच्या प्रयत्नातील कॉंग्रेस आघाडीला शिवसेनेने तिकडे जाऊ नये असे वाटते. शिवसेनेनेही स्वबळाची भाषा कायम ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना, शिवसेनेची भूमिका हा महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वबळावर शिवसेनेचे खासदार भलेही मोठ्या संख्येने निवडून येणार नाहीत, पण ते किती जागांवर भाजपला अपशकून करतील हा कळीचा विषय आहे. त्यामुळेच शिवसेनेभोवतीचे गूढ वाढते आहे. 

सत्तासोपान भाजपच्या आधारानेच चढणे शिवसेनेचे आजवरचे भागधेय आहे. आता ते बदलण्याची भाषा केली जात आहे. शिवसेना हा प्रादेशिक पक्ष असल्याने महाराष्ट्रातल्या आमदारसंख्येवर त्यांचे यश मोजावे लागेल. 1995 मध्ये शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून आले. त्यानंतर भाजप सोबत नसतानाही 2014 मध्ये या पक्षाने 63 आमदार निवडून आणले. मोदी लाटेत मिळवलेले हे यश महत्त्वाचे होते. पण ही संख्या मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी पुरेशी नसल्याने आता 144 मतदारसंघ जिंकणे महत्त्वाचे आहे. शिवसेना अंतिमत: भाजपशी युती करणार असे बहुतांश सगळेच मानतात. प्रश्‍न आहे तो शिवसेना हा जादूचा आकडा गाठण्यासाठी कोणती व्यूहरचना आखणार याचा. खासदार व आमदार युती व्हावी या विचाराचे, अन्‌ कार्यकर्ते "... और भी लडेंगे' या बाण्याचे. तारेवरच्या या कसरतीचा शिवसेनानेतृत्व सामना करते आहे. मुखपत्राने स्वबळाच्या लढाईचे रणशिंग कायम फुरफुरते ठेवले आहे. त्यामुळे सध्या संजय राऊत तेजीत आहेत. पक्षाला निवडणुकीसाठी तयार करण्याची जबाबदारी आपल्याच शिरावर आहे असे ते मानतात, अशी कुजबूज शिवसेनेतून ऐकू येते आहे. 

अयोध्यावारीच्या हिंदुत्ववादी व्यूहरचनेनंतर राऊत यांचा भात्यातला दुसरा बाण आहे तो ठाकरे यांच्यावरचा चित्रपट. तो निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होतो आहे. बॉलिवूडशी बाळासाहेबांच्या असलेल्या जवळिकीमुळे असेल किंवा कसे माहीत नाही, पण पिटातल्या पब्लिकपुढे चित्रपटातून बाळासाहेबांना मांडण्याचा प्रयत्न होतो आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवतण दिले. बाळासाहेबांच्या मैत्रीच्या दिलखुलास कहाण्या पवारांनी ऐकवल्या, तर फडणवीसांनी त्यांचा "रिमोट कंट्रोल' आवडला असता, अशी कबुली देऊन चाणाक्षपणा दाखवला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही संक्रांतीला या चित्रपटाचे पतंग उडवले. बाळासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दिकी या अभिनेत्याने "मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तयार केलेल्या फोटोबायोग्राफीचा उपयोग झाला,' असे मुलाखतीत नमूद करत त्यांचाही उल्लेख केला. "ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे.

भाजपनेही "ब्रॅंड ठाकरे'चा फायदा घेण्याचे ठरवले आहे. दक्षिणेत कमल हसन, रजनीकांत हे अभिनेते चित्रपटांच्या माध्यमातून राजकीय संदेश देण्याचा अभ्यास करीत आहेतच. प्रश्‍न आहे तो शिवसेना या मार्गाने किती प्रचार करेल हा. महाराष्ट्रात हे स्वीकारले जाईल काय हाही प्रश्‍न आहे. शिवसेना कोणता झेंडा घेऊ हाती या भूमिकेतून पर्यायासह अनेक बाबींचा विचार करीत असणार. त्यांच्या निर्णयावर महाराष्ट्राचे राजकारण ठरणार आहे. देशाच्या राजकारणावरही शिवसेना काही प्रमाणात परिणाम करू शकेल. लोकशाहीच्या उत्सवात चित्रपट खरेच भूमिका निभावतात काय, या प्रश्‍नाचे उत्तर संजय राऊत यांचे पक्षातले अन्‌ पक्षाबाहेरचे विरोधक नक्‍कीच शोधत असणार. तिकीटबारी अन्‌ मतबारी या दोन्ही आघाड्यांवर राऊत लक्ष ठेवून आहेत. प्रचाराचा हा रजतमार्ग किती फळतो ते आता पाहायचे. 

Web Title: Shivsena released thackeray movie on election


संबंधित बातम्या

Saam TV Live