सौर ऊर्जेवर चालणारी ई-सायकल !

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 मार्च 2020

कधी पाहिलीय सौर ऊर्जेवर चालणारी ई-सायकल !,

काही शाळेतील विद्यार्थ्यांनी हा चमत्कार केलाय

 

सध्या दुचाकीचे प्रमाण वाढले असले तरी त्यासाठी लागणारे पेट्रोल सातत्याने महाग होत चालले आहे. शरीराला व्यायाम म्हणून सायकल चालवण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. मात्र, अनेक वेळा दमलेले असताना सायकल चालवावी वाटत नाही. अशा वेळी उपयुक्त ठरू शकेल, अशी ‘ई-सायकल’ पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवली आहे. ती सौर ऊर्जेवर चालते.

शहरातील अंतर दूरदूर होत चालली आहेत. त्यात दुचाकी वाहनांची संख्या वाढल्याने प्रदूषणाबरोबरच वाहतूक कोंडीचीही समस्या वाढली आहे. यावर बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागातील विद्यार्थी चैतन्य काण्णव, संदीप जोशी, अंकुश भोपळे, अनुज चव्हाण, शुभम राठोड, अर्जुन कुबडे, इंतेसार खान यांनी ई-सायकल निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला. यासाठी सायकल, इलेक्ट्रिक मोटर, लीड ॲसिड बॅटरी, चार्जर, सायक्लोमीटर या साधनांचा उपयोग केला. या बॅटरीच्या चार्जिंगसाठी सोलर पॅनेल वापरण्यात आले आहे. यासाठी १२ हजार रुपये खर्च आला आहे.

या सायकलच्या चाचण्या घेण्यात आल्या असून, शहरी रस्त्यांवर चालविण्यास उपयुक्त असल्याचे लक्षात आले. या सायकलला ॲक्सलेटर बसवला असून, त्याद्वारे वेग कमी अधिक करता येतो. बॅटरी पूर्ण चार्ज असताना ताशी २२ ते २५ किलोमीटर वेगात धावते. एका चार्जिंगमध्ये २५ किलोमीटर पर्यंतचा प्रवास पूर्ण करते.

सौर ऊर्जेवरील ही ई-सायकल वाढत्या इंधन दराच्या काळात मोठा दिलासा देणारी ठरली आहे. या सायकलमुळे प्रदूषणाला आळा बसतो. शिवाय चढावर आवश्यक असल्यास पायडलचा उपयोग करता येतो. पेट्रोल दुचाकीला हा योग्य पर्याय असल्याचे मत प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. यासाठी महाविद्यालयातील प्रा. डॉ. संजय भागवत यांचे मार्गदर्शन मिळाले.

बाबासाहेब नाईक अभियांत्रिकीच्या वार्षिक स्नेहसंमेलन 'गेटी-२०२०' मध्ये उद्घाटक पुसद वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे व प्राचार्य डॉ. अविनाश वानखडे यांनी या ई-सायकलवर कॅम्पसमध्ये फेरी मारून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. संस्थेचे अध्यक्ष जय नाईक, प्राचार्य प्रा. जयदीप इंगळे यांनी विद्यार्थी संशोधकांचे कौतुक केले.

 

WEB TITLE- Solar Powered E-Cycle!


संबंधित बातम्या

Saam TV Live