VIDEO | नेमकी, कोणती लस प्रभावी? औषध कंपन्यांच्या दाव्यामुळे गोंधळ

साम टीव्ही
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

कोरोनाच्या संकटात लशींवरून संभ्रम
औषध कंपन्यांच्या दाव्यामुळे गोंधळ
कोणती लस प्रभावी सर्वसामान्यांना पडला प्रश्न

कोरोनावरील आपलीच लस प्रभावी असल्याचा दावा प्रत्येक कंपनी करतेय. त्यामुळे प्रत्यक्ष बाजारात लस आल्यानंतर कोणत्या लशीला प्राधान्य द्यावं, याबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. अशा वेळी सर्वसामान्यांनी काय करावं? हे सांगणारा हा रिपोर्ट.

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी अवघ्या जगाचे डोळे कोरोना लशीकडे लागलेले असतानाच आपलीच लस प्रभावी असल्याचा दावा प्रत्येक कंपनी करतेय. मॉडर्ना या अमेरिकी कंपनीच्या मते त्यांची लस 95 टक्के प्रभावी आहे, तर आपली लस 90 टक्के प्रभावी असल्याचा दावा फायझर या कंपनीने केलाय. औषध कंपन्यांच्या या दाव्या प्रतिदाव्यांवर सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावालांनी भाष्य केलंय.

सर्वात आधी बाजारात येणारी लस हीच उत्तम लस असल्याचा गैरसमज कुणीही करून घेऊ नये. त्याऐवजी लस चार मुद्द्यांवर पारखून घ्यावी असा सल्ला पुनावालांनी दिलाय. ती लस सुरक्षित असावी, अधिक काळासाठी कोरोनापासून रक्षण करण्यासाठी सक्षम असावी. योग्य तापमानात साठवलेली असावी आणि रुग्णांना परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध असावी, असं ट्वीट अदर पुनावालांनी केलंय.
तज्ज्ञांच्या दाव्यानुसार फायझर कंपनीची लस उणे 70 डिग्री तापमानात ठेवावी लागतेय. शिवाय ही लस फक्त पाच दिवसाच्या कालावधीपुरतीच साठवून ठेवणं शक्य आहे. त्यामुळे अमेरिकेतल्या अनेक रुग्णालयांनी या लशीच्या साठवणुकीची यंत्रणा उभारणं अशक्य असल्याचं म्हटलंय. 

ही बाब लक्षात घेता भारतासारख्या देशांमध्ये या लशीचा वापर सहजपणे करणं शक्य नसेल. त्यामुळे कंपन्यांच्या दाव्यांना न भूलता सारासार विचार करून आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लशीबाबत निर्णय घ्या. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live