VIDEO | एसटी कर्मचाऱ्यांची परवड थांबेना! पगारामुळे आत्महत्या केली आणि त्यानंतर पगार आल्याचा मेसेज आला...

साम टिव्ही
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची होत असलेली परवड काही केल्या थांबायचं नाव घेत नाहिये. तीन महिने पगारच नसल्याने घर कसं चालवायचं, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडलाय. याच तणावातून जळगावच्या एका एसटी वाहकाने आत्महत्या केलीय.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची होत असलेली परवड काही केल्या थांबायचं नाव घेत नाहिये. तीन महिने पगारच नसल्याने घर कसं चालवायचं, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडलाय. याच तणावातून जळगावच्या एका एसटी वाहकाने आत्महत्या केलीय.

पाहा ऱ्हदय हेलावणारा हा व्हिडीओ -

काळीज पिळवटून टाकणारा हा आक्रोश आहे एका भावाचा. मनोज चौधरी यांच्या भावाचा. मनोज चौधरी एसटी महामंडळातील वाहक. गाव- रायपूर कुसुम्बा. जिल्हा जळगाव. ते या गावचे रहिवासी. पण आता ते या गावात नसतात. आणि आता ते परत कधी दिसणारही नाहीत. कारण ते आता स्वर्गवासी झालेयत. त्यांनी जीव दिलाय. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलंय एसटी महामंडळ आणि आपल्या मुर्दाड राज्य सरकारने. तीन महिने पगार नाही. कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या मनोज चौधरींचा कडेलोट झाला.जे करू नये ते त्यांनी केलं.पण याला जबाबदार राज्य सरकारच असल्याचं त्यांनी चिट्ठीत लिहून ठेवलंय. मोनज चौधरी यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.

हे झालं मनोज चौधरी यांचं, तिकडे रत्नागिरीतही पांडुरंग गडदे नावाच्या एसटी चालकाचा मृतदेह घरात सापडलाय. त्यांनीही आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आत्महत्या करणं चूकच, पण तीन-तीन महिने हातात पगाराची दमडीही न देणाऱ्या सरकारचाच हा मोठा अपराध आहे. पगार नसल्याने बारामतीतल्या अशोक जंगलेंना सिमेंट-वाळूची घमेली वाहत मजुरी करावी लागतेय.

या सगळ्या घटना बघून सरकारला जाग आलीय. एसटी कर्मचाऱ्यांचा थकित पगार देण्याची घोषणा केलीय.

सरकारने घोषणा केली, पण जीव गेल्यावर पाणी पाजण्याच्या प्रकारात मोडणारी... ज्या एसटीने महाराष्ट्राला अंगाखांद्यावर घेऊन मिरवलं तिच्या चालक-वाहक-कर्मचाऱ्यांना जीव देण्याची वेळ येत असेल तर त्याची शरम वाटायलाच हवी. आत्महत्या चूकच पण ती करायला लावणाऱ्या सरकारी व्यवस्थेने मुर्दाडपणा सोडायला हवाच.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live