श्रद्धा उत्तरेश्‍वराशी, स्पर्धा ‘ग्लोबल’ जगताशी !

संभाजी गंडमाळे
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - ‘दत्त दर्शनला जायाचं जायाचं, आनंद पोटात माझ्या मावेना मावेना’ चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘झुंज’ या चित्रपटातील हे तुफान गाजलेलं गीत. उत्तरेश्‍वर पेठेतील शिवप्रसाद सोंगी भजनाने मराठी सिनेसृष्टीला या गीताच्या माध्यमातून जणू भजनात दंग केले. १९७३-७४ ला गीताने अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घातली. आजही सोशल मीडियावरून जगभरातील मराठी मनांना हे गीत भुरळ घालतं. अध्यात्माची गोडी लावतं. 

कोल्हापूर - ‘दत्त दर्शनला जायाचं जायाचं, आनंद पोटात माझ्या मावेना मावेना’ चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘झुंज’ या चित्रपटातील हे तुफान गाजलेलं गीत. उत्तरेश्‍वर पेठेतील शिवप्रसाद सोंगी भजनाने मराठी सिनेसृष्टीला या गीताच्या माध्यमातून जणू भजनात दंग केले. १९७३-७४ ला गीताने अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घातली. आजही सोशल मीडियावरून जगभरातील मराठी मनांना हे गीत भुरळ घालतं. अध्यात्माची गोडी लावतं. 

उत्तरेश्‍वर पेठेतील वाघांनीच ही किमया साधली. उत्तरेश्‍वर प्रासादिक वाघाची तालीम आज (ता. २६) शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे आणि या निमित्तानं वर्षभर उत्तरेश्‍वर परिसरातील इतिहासाला उजाळा मिळतानाच विविध सामाजिक उपक्रमांचा जागरही मांडला जाणार आहे.  
दरम्यान, एकीकडे उत्तरेश्‍वर महादेवावरची अफाट श्रद्धा आणि त्याच वेळी दुसरीकडे बदलत्या जगाशी नाळ जुळवत इंटरनेटच्या माध्यमातून येथील तरुणाई आता ग्लोबल जगताशी स्पर्धा करू लागली आहे.

अहंकाराची वाणी...!
उत्तरेश्‍वर महादेव मंदिर परिसरात एक फलक लक्ष वेधून घेतो. हे मंदिर कोणी बांधले, याचे नाव येथे नाही. कारण ‘मी केले’ म्हणजे अहंकार असतो, अशा आशयाचा हा फलक अहंकाराची वाणी माणसाला संपवते, असाच जणू संदेश देतो.

उत्तरेश्‍वर महादेव मंदिरात १८५० पासून भजनाची परंपरा. सुरुवातीला एकतारी भजन येथे चालायचे. त्या वेळी तालमीची इमारत म्हणजे एक झोपडीच होती. त्यातच भजनाचे सूर उमटायचे. पुढे १८९४ ला उत्तरेश्‍वर वाघाची तालमीची छोटी इमारत उभी राहिली आणि या भजनाला व्यापकता आली. पोतं-पोतं भरून दिमड्या येथे आणल्या गेल्या. आजही येथे आध्यात्मिक आनंदोत्सव विविध औचित्य साधून सुरूच असतो. मंदिरातील रोजच्या सामुदायिक आरती सोहळ्यानेही यंदा एकवीस वर्षे पूर्ण केली आहेत. 

एकूणच उत्तरेश्‍वर पेठेची शान काही औरच. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बंदीहुकूम असतानाही हलगी वाजवत मोर्चा काढणारी मंडळी इथलीच. इथली एकजूट हे कोल्हापूरच्या एकजुटीचं प्रतीक. उत्तरेश्‍वर चौकातच महापालिकेचे न्यायमूर्ती रानडे विद्यालय. या शाळेजवळच रस्त्यापासून जरा सखल भागात ज्येष्ठ चित्रकार श्‍यामकांत जाधव यांचं घर. शाळेचे बांधकाम ज्यावेळी सुरू झाले, त्या वेळी बांधकामावर श्‍यामकांत सरांनी डोक्‍यावरून दगड वाहिले. कारण शिक्षण घेण्यासाठी पैसे आणि त्यासाठी काम करणे त्यांना भागच होते. पुढे याच शाळेत ते शिक्षक झाले; पण चित्रकलेतच करिअर करायचे, अशी खूणगाठ बांधलेल्या सरांनी अखेर ही नोकरीही सोडली आणि मुंबई गाठली. सध्या कोल्हापूरच्या चित्रपरंपरेतील त्यांची कारकीर्द म्हणजे एक सुवर्णपान आहे.

श्‍यामकांत जाधव सरांच्या या संघर्षातून फुललेल्या यशोगाथेचा प्रातिनिधीक उल्लेख एवढ्यासाठीच की, इथला प्रत्येक माणूस कष्टाच्या झालरीतूनच मोठा होतो आणि तो ज्या क्षेत्रात गेला तेथे सर्वोत्तम ठरतो, या देदीप्यमान इतिहासाचे ते प्रमुख साक्षीदार आहेत. भाविक विठोबा मंदिरातील विठूनामाचा गजर असो किंवा काळभैरवाचा पालखी सोहळा, पायी पंढरपूर वारी, आनंदी महाराज मठीतील उत्सव या साऱ्या गोष्टी या पेठेने आजही जपल्या आहेत. येथे गणेशोत्सव रंगतो आणि संयुक्त शिवजयंती व नवरात्रोत्सवही. पटसोंगट्या असोत किंवा म्हशीच्या शर्यती, पेठेने आपली अस्सल परंपरा जपली आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live