सातारा जिल्ह्यातील समर्थ स्थापीत मारुती मंदिरे....

सातारा जिल्ह्यातील समर्थ स्थापीत मारुती मंदिरे....
Samarth Ramdas Swami - Hanuman

प्रत्येक मारुती मंदिर हे शक्तीचा स्रोत असते, अशी समर्थांची श्रद्धा होती. समर्थांना मारुतीची भक्ती, स्वामिनिष्ठा आवडत होती. त्यावर समर्थ प्रेम करत होते. समर्थ रामदासांनी शके 1566 ते शके 1576 अशा दहा वर्षांत अकरा मारुतींची मंदिरे स्थापन केली. सातारा (Satara) जिल्ह्यातील चाफळ येथे तीन, माजगाव (चाफळनजीक) येथे एक, तसेच उंब्रज, मसूर, शहापूर (ता. कऱ्हाड) Karad येथे तर बहे बोरगाव, बत्तीस शिराळा, मनपाडळे, पारगाव अशा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत चार मारुती Maruti मंदिरे आहेत. या मंदिरातील मूर्ती पाषाणातील आणि चुन्यातील आहेत. त्यामधील काही मूर्ती पाच ते सहा फूट उंचीच्या आहेत. या सर्व अकरा मंदिरांत रोज पूजा, अभिषेक, आरती असे कार्यक्रम होतात. तसेच हनुमान जयंतीचा उत्सवही स्थानिक नागरिक साजरा करतात. श्रावणातील शनिवारी एकाच दिवशी सर्व मारुतींचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे. (Hanuman Mandirs Founded by Samarth Ramdas in Satara District)

शहापुरचा मारुती

शहापूर (ता. कऱ्हाड) येथील मारुतीची मूर्ती चुन्यापासून तयार केली असून, ती सहा फूट उंच आहे. शके 1566 मध्ये या मूर्तीची स्थापना केली आहे. या मारुतीला चाफळच्या रामनवमी उत्सवात पालखीचा मान आहे.

जायचे कसे - सातारा - बंगळुर महामार्गावरून उंब्रजच्या पुढे एक किलोमिटर अंतरावरून मसूरकडे रस्ता जातो. सुमारे दहा किलो मिटर अंतरावर मसूर नजीक शहापूर आहे. कऱ्हाड मसुर रस्त्यावर शहापुर फाटा असून मुख्य रस्त्यापासून 500 मीटरवर नदीकिनारी हे मंदिर आहे. कोणत्याही वाहनाने, एसटीने जाता येते

नजीकची ठिकाणे - जवळच यशवंतराव चव्हाण यांची कर्मभुमी असलेले कऱ्हाड असून तेथे कृष्णा कोयना नदीचा संगम आहे. या प्रितीसंगमावर यशवंतरावांची समाधी आहे. तेथील बगीच्या,कृृष्णामाई मंदिर पाहण्यासारखे आहे.

राहण्याची व्यवस्था : शहापुरला राहण्याची, भोजनाची व्यवस्था नाही. त्यासाठी कऱ्हाडला जाणे सोईस्कर

मसुरचा मारुती

मसूर (ता. कऱ्हाड) येथील मारुतीची स्थापना शके 1567 मध्ये झाली आहे. मसूर मधील ब्रह्मपुरी भागात हे मारुती मंदीर आहे. मुर्ती चुन्यात तयार केलेली असून उंची पाच फुट आहे. मुर्तीची मुद्रा सौम्य, प्रसन्न आहे. देवळाच्या परिसरात झाडीही आहे. देवळाचा सभामंडप 13 फुट लांबीरुदीचा आहे. सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थानने मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे. हनुमान जयंतीचा मोठा उत्सव केला जातो.

राहण्याची व्यवस्था - येथील मठात राहण्याची व्यवस्था होऊ शकते. येथे कोणत्याही वाहनाने, एसटीने जाता येते. नजीकच रेल्वे स्टेशन आहे.

चाफळ येथील मारुती -

दास मारुती, वीर मारुती, खडीचा मारुती (शिंगणवाडी)
महामार्गावरील उंब्रज पासून अकरा किलोमिटर अंतरावर चाफळ आहे.
चाफळ (ता. पाटण) येथे तीन मारुती आहेत. त्यापैकी दास मारुती आणि वीर मारुतीची स्थापना शके 1567 मध्ये, तर खडीच्या मारुतीची स्थापना शके 1571 मध्ये करण्यात आली आहे.

खडीचा मारुती

चाफळ पासून दक्षीणेस एक किलोमिटर अंतरावरील टेकडीवर आहे. स्वच्छ हवा, पाणी, झाडी यामुळे हा परिसर रम्य आहे. टेकडीच्या पायथ्याशी रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या भेटीचे ठिकाण असून तेथे सुंदर स्मारक उभारले आहे.चाफळ येथील श्रीराम मंदिराच्या पुढील बाजूस दास मारुती तर मागील बाजूस वीर मारुती आहे. या मुर्ती चुन्यात तयार केलेल्या असून त्यांची उंची सुमारे सहा फुट आहे. मुर्ती त्यंत प्रमाणबद्ध आहेत.

उंब्रजचा मारुती
उंब्रज येथील मारुतीची स्थापना शके 1570 मध्ये करण्यात आली आहे.
तसेच उंब्रज पासून उंब्रज - चाफळ रस्त्यावर नऊ किलोमिटर अंतरावरील माजगाव मारुती मंदिर आहे. दगडमातीच्या मंदिराचा आता जिर्णोद्धार करण्यात आला आहे. माजगाव येथील मारुतीची स्थापना 1571 मध्ये झाली. (Hanuman Mandirs Founded by Samarth Ramdas in Satara District)

याशिवाय बहे बोरगाव (ता. वाळवा, जि. सांगली) व मनपाडळे येथील मारुतीची स्थापना शके 1573, पारगावचा मारुती शके 1574, तर बत्तीस शिराळा येथील मारुतीची स्थापना शके 1576 मध्ये करण्यात आली. काही मारुतीची मंदिरे शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या परिसरात आहेत. त्या परिसरात भक्त व शिष्यगण वाढविण्यासाठी समर्थांनी या मंदिराची स्थापना केली असावी. काही मंदिरे कृष्णाकाठी आहेत.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com