
नवी दिल्ली : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा एकेकाळचा जिगरी दोस्त...ज्याच्या बॅटमधून धावा बरसत होत्या असा टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज विनोद कांबळी सध्या आर्थिक संकटाचा सामना करतोय. भारतीय संघाचा हा माजी क्रिकेटपटू बेरोजगार झाल्याचं वृत्त आहे. आर्थिक चणचण इतकी भासतेय की आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी क्रिकेटच्या मैदानावर अगदी मिळेल ते कोणतंही काम करण्याची त्याची तयारी आहे. बीसीसीआयकडून मिळणारी पेन्शन हेच त्याचे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे.
३० वर्षांपूर्वीचा काळ असेल. विनोद कांबळीने आपल्या सुरुवातीच्या सात सामन्यांमध्ये ७९३ धावा कुटून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. १९९३ मध्ये एखादा फलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये ११३.२९ च्या स्ट्राइक रेटनं धावा कुटत असेल तर, तो किती विस्फोटक असेल याचा अंदाज लावता येईल. त्याचवर्षी विनोद कांबळीनं २२४ आणि २२७ अशा सर्वोत्कृष्ट वैयक्तिक धावा केल्या होत्या.
खोऱ्यानं धावा ओढणारा हाच स्टार फलंदाज विनोद कांबळी सध्या बेरोजगार आहे. तो आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभा आहे. क्रिकेटच्या मैदानावर मिळेल ते काम करण्याची त्याची तयारी आहे. बीसीसीआयकडून मिळणारी पेन्शन हेच त्याचं उत्पन्नाचं एकमेव साधन आहे, असं तो सांगतोय.
५० वर्षीय विनोद कांबळीला आता ओळखणेही कठीण झाले आहे. पांढरी झालेली दाढी आणि डोक्यावर टोपी अशा पोशाखामध्ये तो एमसीएच्या कॉफी शॉपमध्ये पोहोचला त्यावेळी अनेकांनी त्याला ओळखलेही नाही. क्लबमध्येही तो आपल्या ओळखीतल्या व्यक्तीच्या सोबत आल्याचे सांगण्यात येत आहे.
विनोद कांबळीला बीसीसीआयकडून ३० हजार रुपये पेन्शन मिळतेय. तेच त्याच्या उत्पन्नाचं साधन आहे. त्यासाठी त्याने क्रिकेट मंडळाचे आभारही मानलेत. तो २०१९ मध्ये मुंबई टी २० लीगमध्ये एका संघाचा प्रशिक्षक होता. कांबळीची चर्चा होते, त्यावेळी सचिन तेंडुलकरची आठवण होतेच.
आपल्या परिस्थितीबाबत बोलताना कांबळी म्हणतो की, त्याला (सचिनला) याबाबत सर्व काही माहिती आहे. मात्र, आपण त्याच्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही. त्याने मला तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीची जबाबदारी दिली होती. मी खूप खूश होतो. तो माझा चांगला मित्र आहे. तो नेहमीच माझ्या पाठिशी उभा राहिला आहे.
टीम इंडियाकडून २००० मध्ये अखेरचा सामना खेळणारा कांबळी अवघ्या १७ सामन्यानंतर संघाबाहेर झाला होता. २३ व्या वर्षी तो अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यावेळी त्याची धावांची सरासरी ५४ इतकी होती. पण तो संघात पुनरागमन करू शकला नाही.
Edited by - Nandkumar Joshi
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.