
बर्मिंगहॅम: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताचा निम्मा संघ शंभरीच्या आत ढेपाळला असताना, तडाखेबंद शतकी खेळीनं रिषभ पंतनं टीम इंडियाच्या डावाचा पाया रचला. तर त्यावर बहारदार शतक ठोकून ऑलराउंडर रविंद्र जडेजानं कळस रचून संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. (India vs England 5th Test Day 2 Rishabh Pant and Ravindra Jadeja)
रविंद्र जडेजानं पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये शतक ठोकलं आहे. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे आणि वर्षातील दुसरे शतक आहे. जडेजानं इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीत (England vs India) १८३ चेंडूंचा सामना करताना हा करिश्मा केला आहे.
भारताच्या (Team India) पहिल्या डावाची सुरुवात अडखळत झाली. ९८ धावा असताना ५ विकेट तंबूत परतले होते. त्यानंतर रिषभ पंत (Rishabh Pant) आणि जडेजानं मोठी भागीदारी रचून संघाला सावरलं. भारताचा पहिला डाव ४१६ धावांवर आटोपला. जडेजा १०४ धावा करून जेम्स अँडरसनच्या चेंडूवर बाद झाला. जसप्रीत बुमराहनं जबरदस्त मनोरंजन केलं. तो ३१ धावा करून नाबाद राहिला. तत्पूर्वी रिषभ पंतने १४६ धावा कुटल्या.
भारतीय संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. पंत आणि जडेजा यांच्या शतकांमुळे भारतीय संघ या मालिकेत आघाडी कायम राखून आहे. हा अखेरचा कसोटी सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने संघ मैदानात दमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.
कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी भारतीय संघाने ७ बाद ३३८ धावांपासून आपला खेळ सुरू केला. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि मोहम्मद शामीने ३७१ धावांपर्यंत मजल मारली. दोघांनी आठव्या विकेटसाठी ४८ धावा जोडल्या. शमी ३१ चेंडूंमध्ये १६ धावा करून बाद झाला. स्टुअर्ट ब्रॉडनं त्याला बाद केलं. त्याचा हा कसोटी कारकिर्दीतील ५५० वा विकेट आहे. तर जडेजाने १३ चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. याआधी त्याने यावर्षी मार्चमध्ये श्रीलंकाविरुद्ध मोहालीमध्ये नाबाद १७५ धावा केल्या होत्या. इंग्लंडविरुद्ध त्याने एजबेस्टनमध्ये १०४ धावा केल्या.
३३ वर्षीय रविंद्र जडेजानं परदेशात पहिलंच शतक झळकावलं आहे. याआधीची दोन्ही शतके त्याने मायदेशातील मैदानांवर केली होती. या सामन्याआधी एजबेस्टनमध्ये भारताकडून केवळ सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली याने शतके केली होती. या सामन्यात पंत आणि जडेजानं शतकी खेळी करून इतिहास रचला. पंतने ८९ चेंडूंवर आपलं वेगवान शतक पूर्ण केलं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.