
मुंबई: दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाच टी- २० सामन्यांच्या मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांत टीम इंडियाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा दोन्ही सामन्यांत दारूण पराभव झाला. टीम इंडियासाठी (Team India) उर्वरित तीनही सामने आता 'करो या मरो' अशीच आहेत.
तिसऱ्या सामन्यात फॉर्ममध्ये असलेले भारतीय फिरकीपटू आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्यावर दबाव असेल. याशिवाय स्फोटक फलंदाज म्हणून ख्याती असलेल्या रिषभ पंतवरही चांगली कामगिरी व्हावी यासाठी प्रचंड दबाव असेल. सलामीवीर म्हणून आतापर्यंत इशांतने चांगली कामगिरी केली असली तरी, ऋतुराजच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
भारताचा संघ सलग १२ टी-२० सामने जिंकल्यानंतर या मालिकेत ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी उतरला होता. मात्र, दक्षिण आफ्रिका संघानं टीम इंडियाला सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून बॅकफूटवर नेले. पंतच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला अनेक आघाड्यांवर अपयश आल्याचे दिसले. तिसऱ्या सामन्यात या सगळ्या उणिवा दूर करून सामना जिंकावा लागेल.
पहिल्या टी-२० मालिकेत भारतानं फलंदाजीत चांगली कामगिरी केली. धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, गोलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे तो सामना गमवावा लागला. तर दुसऱ्या सामन्यात फलंदाजांनी विशेषतः पहिल्या फळीतील फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली नाही. त्यामुळे संघाला १५० धावाही पूर्ण करता आल्या नाहीत. तर गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली असली तरी, सामना जिंकून देता आला नाही.
आतापर्यंत सलामीच्या फलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात केलेली नाही. इशान किशननं फलंदाजी चांगली केली आहे. पण ऋतुराजने पहिल्या सामन्यात २३ धावा आणि दुसऱ्या सामन्यात फक्त एक धाव केली आहे. जलदगती गोलंदाजांचा सामना करताना त्याच्या फलंदाजीच्या तंत्रावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे, श्रेयस अय्यरनं चांगली सुरुवात केली असली तरी, अपेक्षित गतीने धावा केल्या नाहीत. हार्दिक पंड्याने पहिल्या सामन्यात सुरेख फटकेबाजी केली होती. पण कटकच्या मैदानात त्याची बॅट हवी तशी तळपली नाही. तो गोलंदाजीतही अपयशी ठरला. पंतनेही पहिल्या सामन्यात २९ तर दुसऱ्या सामन्यात अवघ्या ५ धावा केल्या.
कर्णधार पंतच्या निर्णयांवरही प्रश्न
कर्णधार म्हणून रिषभ पंतने (Rishabh Pant) घेतलेल्या अनेक निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दुसऱ्या सामन्यात अक्षर पटेलला दिनेश कार्तिकच्या आधी फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय चुकीचा ठरला होता. कर्णधार आणि ऑलराउंडर म्हणून त्याच्याकडून चांगली कामगिरी होईल अशी अपेक्षा आहे. गोलंदाजीतही युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल या जोडीनेही निराशा केली आहे. डेविड मिलर आणि तुलनेने नवख्या असलेल्या रासी वान डेर डुसेन आणि हेनरिक क्लासेनसारख्या फलंदाजांनी त्यांचा सामना करताना सहजरित्या धावा केल्या आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.