
आशिया कपच्या फायनलमध्ये सिराजने श्रीलंकन फलंदाजाच्या अब्रूची लख्तरं प्रेमदासा स्टेडीयमवर टांगली. सिराजने एकाच षटकात चार गडी बाद केले. अंतिम सामन्यात ७ षटकात २१ धावा देऊन तब्बल ६ गडी बाद केले. सिराजच्या वादळासमोर श्रीलंकन टीम पत्त्यांच्या बंगल्यासारखी ढासळली. याच मोहम्मद सिराजच्या संघर्षाची कहाणी त्याच्या या यशापेक्षाही खास आहे. (Latest Marathi News)
मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिराजचा क्रिकेटर होण्यापर्यंतचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. त्याने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मोहम्मद सिराज एका सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा. मूळचा हैदराबादचा.. वडील रिक्षा चालवायचे. आई गृहिणी...
सिराज सुरुवातीला फलंदाजी करायचा. त्याला फलंदाजीची आवडत होती. पण मग तो गोलंदाज कसा काय झाला. हा किस्साही भारीच आहे. लहानपणी सिराजचे मित्र म्हणायचे की तू बॅटिंगपेक्षा गोलंदाजी भारी करतोस. गोलंदाजीच कर... सिराजच्या मोठा भावाने त्याला क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी प्रेरणा दिली आणि अखेर एक गोलंदाज म्हणूनच त्याने प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
हैदराबादच्या चारमिनार क्रिकेट क्लबमधून सिराजने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. साल होत २०१५-१६.. रणजीचे सामने सुरु होते आणि या रणजीदरम्यान एकच नाव चर्चेत होतं. ते म्हणजे मोहम्मद सिराज... त्याला कारणही खास होतं.. (Cricket News)
सिराजने अवघ्या ९ मॅचमध्ये तब्बल ४१ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने रणजीत केलेल्या या कामगिरीमुळे अखेर रेस्ट ऑफ इंडिया टीममध्ये त्याची निवड झाली. हैदराबाद संघाकडून खेळताना त्याला १० लाख रुपये मिळायचे. सलग दोन सिजन तो हैदराबादकडूनच रणजी खेळला.
क्रिकेटर म्हणून सिराजची पहिली कमाई होती ५०० रुपये. एका क्लब मॅचमध्ये सिराजने ९ विकेट्स काढले होते. त्यामुळे खूश होऊन त्याच्या काकांनी त्याला ५०० रुपये दिले होते.
सिराजने पैसे कमावून आपल्या आईवडिलांसाठी नवं घर घ्यायचं ठरवलं होतं. आयपीएलमधून मिळालेल्या पैशांमधून सिराजने आपल्या आईवडिलांसाठी घर घेतलं.
४ नोव्हेंबर २०१७ साली सिराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पदार्पण केलं. हा क्षण त्याच्यासाठी फारच मोठा होता.. सामना सुरु होण्याआधी राष्ट्रगीत सुरु झालं आणि त्यावेळी सिराजचे डोळे पाणावले. न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० सीरीजच्या दुसऱ्या सामन्यात सिराजने आपल्या पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळली.
आयपीएलमध्ये २०१८ साली सिराजच्या आयुष्यात एक मोठा बदल घडला. हैदराबादने सिराजला २०१८ साली रिलीज केलं. नंतर तो विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात आला. यानंतर तो आणखी चमकला.
२०२० साली ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होता. तेव्हा कोरोनाचा काळ होता. याचवेळी हैदराबादमध्ये मोहम्मद सिराजच्या वडिलांची तब्येत बिघडली. सिराज सिडनीच्या मैदानात प्रॅक्टिस सेशनमध्ये होता. त्यावेळी इकडे हैदराबादमध्ये त्यांच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. प्रॅक्टिस सेशन संपवून सिराज परतला आणि तेव्हा त्याला वडील गेल्याचं कळलं.
आपल्या मुलानं देशाचं नावं मोठं करावं, हे सिराजच्या वडिलांचं स्वप्न होतं. ते पूर्ण करण्यासाठी सिराजने प्रचंड मेहनत घेतली होती. या मेहनतीचं चीज करण्याची वेळ आली होती. पण मुलगा टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियात खेळत असतानाच सिराजच्या वडिलांचं निधन झालं. एकीकडे वडील गेल्याचं दुःख.. दुसरीकडे टीम इंडियात खेळण्याची मिळालेली संधी. अशा विचित्र मानसिकतेतून सिराज तो सामना खेळला. सिराजला आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाता आलं नव्हतं.
वडील जाण्याचं दुःख विसरुन त्याला पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजीसाठी तयार व्हावं लागणार होतं. लहानपणी रिक्षा चालवून वडिलांनी आपल्याला क्रिकेटर होण्यासाठी घेतलेले काबाड कष्ट, अत्यंत गरिबीतून त्यांनी स्वतः अनेक गोष्टींचा त्याग करत आपल्याला दिलेला आनंद. या सगळ्याची जाणीव सिराजने ठेवली. त्याचा खेळ दिवसेंदिवस आणखी प्रगल्भ होत गेला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.