
मुंबई : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांसह दिग्गज संघांना मागे टाकून आपल्या कामगिरीच्या जोरावर हार्दिक पंड्याचा गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसन याचा राजस्थान रॉयल्स हे दोन संघ यंदाच्या आयपीलच्या फायनलमध्ये (IPL Final 2022) पोहोचले आहेत. पहिलंच आयपीएल जेतेपद जिंकण्याचं गुजरातचं लक्ष्य असेल. तर राजस्थानचा संघही गुजरातला नमवून आयपीएल विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. आता यंदाची आयपीएल स्पर्धा कोण जिंकणार? याची उत्सुकता लागली आहे. तर फायनल नेमका कोणता संघ जिंकणार हे या दोन्ही संघांतील पाच खेळाडू ठरवणार आहेत. अंतिम लढतीत या खेळाडूंची कामगिरी कशी होते, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी गुजरात आणि राजस्थान (Gujarat Titans vs Rajasthan Royals) या दोन बलाढ्य संघांमध्ये फायनल रंगणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा फलंदाजांच्या बॅटमधून धावांचा पाऊस कोसळू शकतो. फायनलमध्ये पोहोचलेल्या राजस्थानचा स्फोटक फलंदाज जोस बटलर यानं आतापर्यंत ४ शतके ठोकली आहेत.
बटलरने (Jos Buttler) यंदाच्या आयपीएलमधील (IPL) १६ इनिंगमध्ये ५९ च्या सरासरीने ८२४ धावा कुटल्या आहेत. त्यात चार अर्धशतकांचाही समावेश आहे. त्याचा स्ट्राइक रेट दीडशेहून जास्त आहे. तर त्याच्या संघातील अन्य कोणत्याही सहकाऱ्याने ४५० धावाही केलेल्या नाहीत. त्यामुळे बटलरची कामगिरी संघासाठी किती महत्वाची आहे, हे यावरून दिसून येते. गुजरात टायटन्सकडून कर्णधार हार्दिक पंड्याने ४ अर्धशतकांसह ४५३ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १३३ चा आहे. तर संघातील स्फोटक फलंदाज डेविड मिलर याने ६४ च्या सरासरीने ४४९ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १४१ चा आहे. राजस्थानसोबत झालेल्या दोन सामन्यांत गोलंदाजांना पंड्या आणि मिलर यांना बाद करता आलेले नाही. (hardik pandya-david miller)
जोस बटलर, हार्दिक पंड्या आणि मिलर यांच्या एकूण धावा बघितल्या तर, त्या जवळपास १७०० हून अधिक धावा आहेत. फायनलमध्ये या तीन खेळाडूंची कामगिरी महत्वाची असेल. बटलर संघाला आक्रमक सुरुवात करून देतो. तर मिलर आणि पंड्या हे दोघे मधल्या फळीत चांगली कामगिरी करून संघाला मजबूत स्थितीत पोहोचवण्याचे काम करत आहे असे आतापर्यंत दिसून आले आहे. गोलंदाजांच्या बाबतीत म्हणाल तर, राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे.
२० च्या सरासरीने त्याने सर्वाधिक २६ विकेट घेतल्या आहेत. ४० धावांच्या मोबदल्यात त्याने ५ विकेट घेतल्या असून, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने विकेट हॅट्ट्रिकही घेतली आहे. गुजरातकडून संघाला चांगली सुरूवात करून देण्याची जबाबदारी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर आहे. त्याने आतापर्यंत २४च्या सरासरीने १९ विकेट घेतल्या आहेत. २५ धावा देऊन ३ विकेट घेतल्या असून, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळे फायनल कोण जिंकणार हे तीन स्फोटक फलंदाज आणि दोन गोलंदाज अशा पाच खेळाडूंच्या कामगिरीवर ठरणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.