
आशिया चषक स्पर्धेच्या सुपर ४ मध्ये भारताविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्ताननं सपाटून मार खाल्ला. भारतानं सर्वात मोठा विजय मिळवून पाकिस्तानला जबरदस्त हादरा दिला. या हादऱ्यातून संघ अद्याप सावरलेला दिसत नाही. श्रीलंकेविरुद्ध 'करो या मरो' लढतीसाठी त्यांनी अर्धा संघच बदलून टाकला आहे. त्यांनी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली असून, पाच बदल केले आहेत.
आशिया चषक स्पर्धा २०२३ मध्ये गुरुवारी (१४ सप्टेंबर) पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात अत्यंत महत्वाची आणि निर्णायक लढत होणार आहे. पाकिस्तानसाठी हा करो या मरो असाच हा सामना असणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, तो अंतिम फेरीत भारताविरुद्ध मैदानात उतरेल. (Latest sports updates)
तर या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचा प्रवास इथेच थांबणार आहे. पाकिस्तानसाठी महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या असलेल्या या सामन्याच्या आदल्या दिवशीच त्यांनी प्लेइंग ११ जाहीर केली आहे.
भारताविरुद्धच्या पराभवाच्या धक्क्यातून पाकिस्तान सावरला नाही. कारण श्रीलंकाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानने आपल्या अंतिम ११ खेळाडूंच्या संघात एक, दोन नव्हे तर तब्बल पाच बदल केले आहेत. याचाच अर्थ अर्धा संघच बदलला आहे.
श्रीलंकाविरुद्धच्या होणाऱ्या सामन्यासाठी जाहीर केलेल्या प्लेइंग ११ मध्ये फखर जमान, आगा सलमान, फहीम अशरफ, नसीम शाह आणि हारिस रउफ यांना स्थान देण्यात आले नाही. त्यांच्या जागी मोहम्मद हारिस, सउद शकील, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, जमान खान यांना संधी देण्यात आली आहे.
फखर जमानच्या जागी सलामीला मोहम्मद हारिस येणार आहे. तर मधल्या फळीत सउद शकील आणि अष्टपैलू मोहम्मद नवाझ यांच्यावर महत्वाची जबाबदारी असेल. नसीम आणि हारिसच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम ज्युनिअर आणि जमान खान यांना संधी दिली आहे. २२ वर्षीय जमान वनडे पदार्पण करणार आहे.
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणारा सामना पावसामुळं रद्द होण्याची शक्यता आहे. सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना एकेक गुण दिला जाईल. अशा परिस्थितीत नेट रनरेट बघितला जाईल आणि त्यात श्रीलंका बाजी मारेल. याचा अर्थ श्रीलंका थेट अंतिम फेरीत धडक देईल. श्रीलंकेचा नेट रनरेट पाकिस्तानपेक्षा अधिक आहे.
मोहम्मद हारिस, इमाम उल हक, बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सउद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, शाहीन शाह आफ्रिदी, जमान खान.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.