जुन्या टीव्हीच्या चिपमधून लाखो रुपये मिळतात? भंगाराच्या दुकानांमध्ये लोकांची झुंबड

जुन्या टीव्हीच्या चिपमधून लाखो रुपये मिळतात? भंगाराच्या दुकानांमध्ये लोकांची झुंबड

ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्ही तुम्हाला लाखो रुपये देऊ शकते का? या प्रश्नाने तुम्हाला चक्रावून टाकलं ना? हो पण कोल्हापूर कराडमध्ये ही अफवा पसरलीय. महत्त्वाचं म्हणजे भंगाराच्या दुकानात लोक गर्दीही करू लागलेयत.

संपूर्ण गावात किंवा अख्ख्या सोसायटीत पूर्वी एखादीच टीव्ही असायची. तीही ब्लॅक अॅण्ड व्हाईट. तरीही टीव्ही बघण्यासाठी नुसती झुंबड उडायची. काळ बदलला, कलर टीव्ही आले. आणि ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्ही काळाच्या पडद्याआड गेल्या. तरीही याच ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्हीसाठी कराड आणि कोल्हापूरकरांची झुंबड उडालीय. कारणही तसंच आहे मंडळी. ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्हीतली चिप विकत घेऊ आणि मोबदल्यात लाखो रुपये देऊ. अशी अफवा कुणी तरी शाण्याने पसरवली आणि भंगाराच्या दुकानात लोकांची रीघ लागली.

खरंतर या व्हॉल्व्हमधील चिप म्हणजे स्टीलची निव्वळ पट्टी असते आणि आत मर्क्युरी असते. मात्र, हे इलेक्ट्रॉनिक्स पार्टचे उत्पादन २५ वर्षांपूर्वीच बंद झाले आहे. सोने, चांदी हे चांगले वीजवाहक आहेत. त्यांचा वापर अत्यंत सूक्ष्मरीत्या काही इलेक्ट्रॉनिक्स पार्टमध्ये थर देण्यासाठी करतात. मात्र तरीही चिपची किंमत अवघी दोनशे ते तीनशे रुपये इतकीच असते. 

कोणतरी उठतो, सुपीक डोक्यातून काहीतरी पिल्लू सोडतो. आणि लोकांची झुंबड उडते. ही आपल्या देशातली सर्वात मोठी समस्या आहे. टीव्हीच्या व्हॉल्व्हमधील चिप लाखो रुपये देते ही अफवाही त्याच प्रकारात मोडते. टीव्ही मनोरंजन करण्यासाठी असतो. पण लाखो रुपयांना चिप विकली जाते या अफवेने होणारी गर्दीही वेगळंच मनोरंजन करतेय. अर्थात, कराडमध्ये अशी अफवा पसरवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल झालाय. पण, विज्ञानवादाची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील लोकांनी अशा अफवांना बळी पडायचं की नाही. हे ठरवायला नको का?

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com