डाळी स्वस्त तर तांदळाचे भाव वधारले तेलाचा तर भडकाच!

डाळी स्वस्त तर तांदळाचे भाव वधारले तेलाचा तर भडकाच!

सध्या कोरोनामुळे आधीच सर्व हैराण असताना आता सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसलाय. तेलाचे दर वाढले आहेत मात्र डाळींचे भाव घसरले आहेत.

बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी असल्याने धान्य, तांदूळ, डाळीची मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे तूर डाळ, तांदूळ आणि हरभरा डाळीच्या दरात घसरण झालेली आहे. मात्र, खाद्य तेलाचे भाव कडाडले आहेत. तूर डाळींच्या भावाने उच्चांक पातळी गाठल्याने सर्वसामान्यांची झोप उडाली होती. मात्र, आता डाळीची आवक वाढल्याने डाळींचे भाव पुन्हा घसरू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. 

तूर डाळीची वाढलेली आवक आणि हरभरा डाळीला मागणी नसल्याने एक महिन्यापासून डाळींचे दर घसरले आहे. ग्राहकही गरजेनुसार वस्तूंची खरेदी करीत असल्याने डाळींची मागणी कमी झालेली आहे. नोव्हेंबर महिन्यात डाळीच्या दरात विक्रमी भाव वाढ झाल्याने तूरडाळ १०० ते १२० रुपये, मूगडाळ १२० ते १४० किलोवर तर हरभरा डाळ ८५ ते ९५ रुपये किलोवर पोहोचली होती. आता आफ्रिका आणि म्यानमार या देशातून मोठ्या प्रमाणात तूर डाळींची आयात होत आहे. देशातील बाजारातही डाळींची आवक चांगली सुरू झालेली आहे. कर्नाटक, तेलंगाणामध्ये किमान आधारभूत किमतीत तुरीची खरेदी करावी, असे निर्देश नाफेडला दिलेले आहेत. मुंबई पोर्टवर तूर डाळीला ५०ते ७५ रुपये प्रति किलो भाव मिळत आहेत. महाराष्ट्रामध्येही नाफेड आणि साठवणूकदारांकडून डाळीची विक्री करीत असल्याने भाव घसरले आहेत. 

नवीन तांदूळ बाजारात येण्यास अजून पंधरा ते एक महिन्याचा कालावधी लागणार असून जुन्या तांदुळाची मागणी अचानक वाढली आहे. त्यामुळे तांदुळाच्या दरात प्रति किलो पाच ते सहा रुपयाची वाढ झाली आहे. होळीपर्यंत जुन्या तांदुळाची मागणी वाढत असल्याने ही भाववाढ कायम राहण्याची शक्यता आहे. नवीन तांदूळ बाजारात आल्यानंतर भावात घसरण होण्याची शक्यता आहे. विदर्भातील धानांचे ५० टक्के उत्पादन कमी झालेले आहेत. त्याचा फटका तांदळाच्या भाववाढीला बसू लागला आहे. त्यामुळेच जुन्या तांदळाचे भाव प्रति किलो पाच ते सहा रुपयांनी वाढले आहेत. यावर्षी तांदळाचे भाव प्रति क्विंटल एक हजार रुपये अधिक दराने विकले जात आहेत. यंदा उत्पादन कमी असल्याने तांदळाचे भाव चढे राहतील, असे बाजार विश्लेषक प्रताप मोटवानी यांनी सांगितले. दिवाळीनंतर आता लग्नसराईसाठी खाद्य तेलाची मागणी वाढली आहे. त्यात तेलाची आयात कमी झाल्याने खाद्य तेलाच्या भावात विक्रमी भाव वाढ झाली आहे. १५ किलो सोयाबीन डब्ब्यासाठी १८४० ते १८६० रुपये, तर फल्ली तेलासाठी २००० ते २१०० रुपये मोजावे लागत आहेत. साखरेचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता आणि साठा भरपूर असल्याने भाव मात्र स्थिरावलेले आहेत.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com