SAAM SPECIAL | चांगभलं! वाईटातही ही चांगली बातमी, महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेचं देशभर कौतुक

SAAM SPECIAL | चांगभलं! वाईटातही ही चांगली बातमी, महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेचं देशभर कौतुक

लॉकडाऊनमध्ये प्रत्येकाला घरातच जेरबंद व्हावं लागलं. रस्त्यावर चिटपाखरूही नसताना महाराष्ट्राचं प्रशासन मात्र धीरोदात्तपणे सेवा बजावत होतं. महाराष्ट्राच्या प्रशासनानं कसा ठेवला जगासमोर आदर्शाचा वस्तुपाठ. पाहूयात. 'साम टीव्ही'च्या चांगभलं या विशेष रिपोर्टमधून. 

 महाराष्ट्राची कोरोनावर प्रशासकीय मात
 तारांबळ करणाऱ्या गर्दीचे रस्तेही असे सुतक आल्यासारखे चिडीचूप होऊन गेले होते. कोरोनाग्रस्त वाढत होते आणि चालती-फिरती माणसं क्षणार्धात जग सोडून जात होती.  भयानक दहशतीचं वातावरण.  अगदी म्हाताऱ्या माणसांपासून लहानग्यांनीही स्वत:ला घरात कोंडून घेतलेलं असताना, आपल्या कुटुंबावरच संकट आल्यासारखं संपूर्ण प्रशासन झोकून देऊन काम करत होतं.  प्रशासकीय चोख नियोजनामुळेच महाराष्ट्रातील अनेक पॅटर्न देशभरात राबवले गेले.

धारावी हा झोपडपट्टीबहुल आणि दाटीवाटीच्या लोकवस्तीचा परिसर असल्याने कोरोनाच्या संसर्गाची जास्त भीती होती. मात्र प्रशासनाने करोनाच्या चाचण्या करणे, घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेणे, गरज पडल्यास अलगीकरण, विलगीकरणाचे उपाय केले. त्याचसोबत संसर्ग टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील शौचालयांची उभारणी करण्यात आली.

 औरंगाबादेत केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी देशभरातील अनेक शहरातं केली गेली. राज्यात अनलॉक असतानाही औरंगाबादेत १० ते १८ जुलैदरम्यान कठोर लॉकडाउनची अंमलबजावणी केली गेली. त्याचसोबत शहरातील व्यापारी व विक्रेत्यांच्या अँटीजेन चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. चाचण्या न करता दुकानं उघडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. आणि शहराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येकाची चाचणी करूनच शहरात प्रवेश देण्यात आला.

 संपूर्ण देशात आणखी एका पॅटर्नचं कौतुक झालं. तो म्हणजे मालेगाव पॅटर्न. धार्मिक, सामाजिक सुसंवाद आणि आयुर्देवाची त्रिसूत्री हा मालेगाव पॅटर्नचा मुख्य आधार होता. मालेगावात धर्मगुरू, लोकप्रतिनिधी, नगरसेवकांना विश्वासात घेऊन जनजागृतीवर भर देण्यात आला. सुमारे ६०० मस्जिदींमध्ये सामूहिक नमाज पठण सुसंवदातून थांबवण्यात आले. त्याचसोबत, ईदच्या दिवशी इदगाह मैदानावर एकही व्यक्ती आली नाही. ‘शब्ब ए बारात’लाही होणारी तीन लाखाची गर्दी रोखण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे, मालेगावच्या मन्सुरा कॉलेजमध्ये बनवलेल्या युनानी काढ्याची मागणी देशभरातून झाली.

महाराष्ट्राची कोरोनावर प्रशासकीय मात सुस्तावलेलं कार्यालय, लाल कापडात गुंडाळलेल्या फाइल्स.  किंवा उद्या या. आज साहेब नाहीत.  लंच टाइम झालाय.  वगैरे शब्द ऐकले की, सरकारी कार्यालय आणि सरकारी अधिकारी आपल्या डोळ्यांसमोर येतात.  पण, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर मनावर घेतलं तर कोणत्याही संकटातून वाचण्याचा मार्ग कसा सापडतो.  हे महाराष्ट्राने संपूर्ण जगाला दाखवून दिलंय.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com