SPECIAL REPORT | अ ब ब ब!! मुंबई इंडियन्स

SPECIAL REPORT | अ ब ब ब!! मुंबई इंडियन्स

अ ब ब ब!! मुंबई इंडियन्स

कल्पना करा आपण एका खोल,खोल दरीच्या टोकावर उभे आहोत. खाली पाहिले तर गरगरायला लागते इतकी दरी खोल आहे.समोर चारही बाजूनी उत्तुंग,गगनचुंबी सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत. अशा वेळेस हे निसर्गाचे रौद्र रूप बघून  न कळत उदगार येतो अ ब ब ब ब!!!. अशा दृश्याला इंटिमिडेटिंग असा शब्द आहे. थरकाप उडवणारे दृश्य. मुंबई संघाने ह्या IPL मध्ये त्यांची जी हुकमत स्थापित केली ती दरारा आणि दहशत  यांच्या सीमारेषेवरील होती. इंटिमिडेटिंग. त्याचे मुख्य कारण पहिले दोन बॉलर्स पहिल्या पाच ओव्हर्स मध्ये खतरनाक चेंडूनी सामन्याचा विषयच संपवत होते आणि मुंबईचे सगळेच बॅट्समन फलंदाज कमी पण नॉक आऊट करणारे बॉक्सर जास्त वाटत होते.
अंतिम सामन्यात बोल्टने असाच पहिल्या चार षटकात कंबरडे मोडण्याचे काम केले. आक्रमक दृष्टिकोन दुधारी तलवार असते.स्टोईनीस ने पहिल्याच चेंडूवर शॉट बॉल बघून पुलचा पवित्रा घेतला पण चेंडूची लाईन आणि उंची ह्यामुळे तो पुलच्या पवित्र्यात यायच्या आधीच त्याच्या बॅट ची एज लागली. अशा चेंडूनी दहशत निर्माण होते.बोल्टने ही दहशत संपूर्ण IPL मधल्या कामगिरीने तयार केली होती.दिल्ली संघात पहिल्या सात मध्ये चार डावखुरे फलनदाज  असल्याने राहुल चहारच्या जागेवर ऑफ स्पिनर जयंत यादवची निवड रास्त ठरली. जयंतला जो हलका ऑफस्पिन मिळत होता तो डावखुऱ्याना निश्चित त्रासदायक ठरत होता. या निवडीकरता मुंबई व्यवस्थापनाला स्वतः ची पाठ थोपटून घ्यावी असं वाटलं तर त्याचे ते अधिकारी आहेत.ऋषभ पंतने अर्धशतक केले.पण इतक्या संधी,इतका अनुभव मिळाल्या नंतर तो शेवटपर्यंत थांबून स्कोर 190 पर्यंत नेईल अशी अपेक्षा दिल्ली ने केली असेल तर चूक नाही. संपूर्ण ipl मध्ये धवन आणि अय्यर वर खूप जबाबदारी पडली. बाकीच्यांकडून तितक्या सातत्याने योगदानं झाली नाहीत.
156 चे आव्हान मुंबई करता फारच किरकोळ होते. रोहितने अंतिम सामन्यात त्याचा स्टॅम्प उमटवला. डिकॉक,पांड्या,पोलार्ड,ईशान किशन यांनी टार्गेटचं चोळामोळा करण्याचे काम पूर्ण IPL भर केले तर रोहित आणि सूर्याने मुंबई स्टाईल शैलीचे नयनरम्य दर्शन घडवले. IPL च्या 13 वर्षाच्या इतिहासात असा इंटिमिडेटिंग संघ आठवत नाही. अ ब ब ब!!! मुंबई इंडियन्स.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com