साखरेच्या सरासरी उताऱ्यात एक टक्‍क्‍याने घट

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 जानेवारी 2020

पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे ऊसपिकाचे मोठे नुकसान झाले. तसेच, काही साखर कारखाने इथेनॉलच्या उत्पादनाकडे वळले आहेत. त्याचा परिणाम साखरेच्या उताऱ्यावर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा साखरेच्या सरासरी उताऱ्यात एक टक्‍क्‍याने घट झाली आहे. त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना बसणार आहे.

राज्यात सध्या ७७ सहकारी आणि ६६ खासगी अशा १४३ साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू आहे. साखरेच्या सरासरी उताऱ्याचे प्रमाण १०.४७ टक्‍के इतके आहे. तर, सर्वाधिक उतारा असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रात साखरेचा सरासरी उतारा ११.४५ टक्‍के इतका आहे. हेच प्रमाण गतवर्षी राज्यात ११.५० टक्‍के, तर पश्‍चिम महाराष्ट्रात १२.५० टक्‍के इतके होते. पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे ऊसपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच, या हंगामात राज्यातील २४ साखर कारखान्यांनी बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे साखरेच्या उताऱ्यात घट झाली असून, उत्पादनातही घट होणार आहे.

उसाची उपलब्धता आणि ऊसतोड मजुरांअभावी तीन कारखान्यांनी दीड महिन्यातच गाळप हंगाम बंद केला आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रात साखरेला चांगला उतारा मिळतो. त्याच भागात अतिवृष्टीमुळे ऊसपिकाचे नुकसान झाले. तसेच, बी-हेवी मोलॅसिसमध्ये काही प्रमाणात साखरेचे प्रमाण असते. अशा बी-हेवी मोलॅसिसपासून काही कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे यंदा साखरेच्या उताऱ्यात घट झाली आहे. 
- दत्तात्रेय गायकवाड, साखर सहसंचालक (विकास)

Web Title: sugar declined in Maharashtra
 
संबंधित बातम्या

Saam TV Live