कोरोनाच्या संकटामागे चीनच असल्याच्या संशयाला बळ, जागतिक आरोग्य संघटनेकडूनही चीन आरोपीच्या पिंजऱ्यात

साम टीव्ही
शनिवार, 9 मे 2020
  • कोरोनाच्या संकटामागे चीनच असल्याच्या संशयाला बळ
  • जागतिक आरोग्य संघटनेकडूनही चीन आरोपीच्या पिंजऱ्यात
  • चीनचं वुहान शहरच कोरोनाच्या प्रसाराला जबाबदार

कोरोनामागे चीनचाच हात असल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच आता जागतिक आरोग्य संघटनेनंही त्यावर शिक्कामोर्तब केलंय. WHO नं व्यक्त केलेली निरीक्षणं चीनचा बुरखा फाडणारी आहेत.

कोरोना व्हायरसच्या प्रसारावरून जगभरात चीनला लक्ष्य केलं जातंय. अमेरिकेकडूनही चीनवर वारंवार आरोप केले जातायत, त्यावर आता जागतिक आरोग्य संघटनेनंही शिक्कामोर्तब केलंय.काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबतच जागतिक आरोग्य संघटनेवरही टीकास्त्र डागलं होतं. जागतिक आरोग्य संघटना ही चीनच्या हातातली बाहुली बनल्याचा आरोप त्यांनी केला होता.  या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलेलं मत महत्त्वाचं मानलं जातंय.

WHO कडून चीन आरोपीच्या पिंजऱ्यात

कोरोनाचा प्रसार जगभरात वेगाने होण्यात चीनचा मोठा हातभार असल्याचं मत नोंदवत चीनमधील वुहान शहर हेच कोरोनाचं जन्मदातं असल्याचंही निरीक्षण नोंदवण्यात आलंय. वुहानमधल्या मासेबाजारातून कोरोनाचा प्रसार झाल्याचा आरोपही जागतिक आरोग्य संघटनेनं केलाय. कोरोनाच्या प्रसाराबाबत वुहानमधल्या तत्कालीन परिस्थितीचा तपास होणं गरजेचं असल्याची सूचनाही जागतिक आरोग्य संघटनेनं केलीय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीन सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांचीही चौकशी करायला हवी असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.

कोरोनाच्या प्रसारामागे चीन असल्याचा संशय जगभरातून व्यक्त होतोय, त्याला जागतिक संघटनेनंही एकप्रकारे दुजोराच दिलाय. त्यामुळे चीनच्या भूमिकेची, धोरणांची आणि घेतलेल्या निर्णयांची सखोल चौकशी व्हायला हवी. त्यासाठी विविध देशांच्या शिखर परिषदांनी आणि जागतिक संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live