अजितदादा डरकले : नीट रहायचं. माझी सटकली तर काय खरं नाय 

अजितदादा डरकले : नीट रहायचं. माझी सटकली तर काय खरं नाय 

कर्जत : ""तुमच्याकडे पालकमंत्रिपद होतं मात्र त्याचा पाहिजे तेवढा फायदा झाला नाही. आता मात्र राज्यातला आदर्श मतदारसंघ निर्माण करण्याचे स्वप्न रोहितचे आहे. ते पूर्ण करण्यासाठी विकास आघाडी सरकार पाठीमागे खंबीर उभे राहू मात्र याकरिता आपल्या सर्वांचे सहकार्य आणि साथ लागेल. तो सारखा म्हणत असतो, काका हे करा, काका ते करा. तुम्हीपण सगळं विसरून कामाला लागलं पाहिजे. 

तालुक्‍यातील माहिजळगाव येथे आ. रोहित पवार यांच्या पुढाकारातून सृजन महाराजस्व अभियानात कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील 36 गावांतील 42 हजार लाभार्थींना विविध योजनांचा लाभ प्रमाणपत्र वाटपप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार डॉ. सुधीर तांबे व लहू कानडे, माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, प्रवीण घुले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंजूषा गुंड, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रेय वारे, राजेंद्र कोठारी, जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी उपस्थित होते. 

आता आमचं काम सुरू झालंय... 
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहितला चांगल्या मताधिक्‍याने तुम्ही निवडून दिले. आता तुमचं काम संपलं, पूर्ण केलंय आता आमचं काम आहे. दिलेले शब्द निवडणुकीत दिलेले शब्द आम्ही पूर्ण करू. आयला प्रचारात यायचो, वाटायचं, हेलिकॉप्टरने यावं, रस्त्यांमुळे कंबर पार ढिल्ली व्हायची. कारण मतदारसंघातले रस्तेच तसे होते. आता रस्ते दर्जेदार होतील.चौंडी-राशीन-सिद्धटेक-श्रीक्षेत्र गोदड महाराज- संत श्री संत सीताराम बाबा या व इतर तीर्थस्थळासाठी भरीव आर्थिक तरतूद करू. 

अधिकारी चिरीमिरी घेत असतील तर नाव सांगा बघतो. त्यांच्याकडे एका सर्कलची तक्रार आली होती, तेव्हा मी त्याला सांगेल नीट काम कर, एकदा माझी सटकली तर तुझे काही खरे नाही. रस्ता खराब झाला तर त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकू, असा इशाराही त्यांनी दिला. 

आमदार असावा तर असा.. 
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले रोहित पवार यांच्यावर आपण जबाबदारी टाकली त्यानुसार निवडून आल्यापासून त्यांनी काय केलं. आणि काय करणार आहोत, याचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडला. रोहित हे पवार कुटुंबातील घटक आहेत. मात्र काम त्यांची काम करण्याची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रोहित पवार आहेत. येणाऱ्या पाच वर्षात कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील सर्व विकासाचा अनुशेष भरून निघेल. 

मला हे करायचंय... 
आमदार रोहित पवार म्हणाले, कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातील सर्व विभागांमध्ये महाराजस्व अभियान राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये खर्डा मंडळ (ता. जामखेड) माहिजळगाव मंडळ (ता. कर्जत) व कर्जत शहर या या ठिकाणी शासनाच्या साठ प्रकारच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा. यासाठी पहिल्या टप्प्यात आपण काम केले. यामुळे 42 हजारांपेक्षा अधिक लाभार्थी यातील सर्कलमधून मिळून आले.

पुढचा टप्पा पुढच्या दोन महिन्यांत आपण पूर्ण करणार आहोत. एकूण दोन्ही तालुक्‍यात मिळून दोन लाखापर्यंत लाभार्थ्यांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. जामखेड शहराचा पाणीपुरवठा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून 107 
कोटी रुपयांची योजना आपण मंजूर करून घेतली. कर्जतच्या डेपोचा प्रश्न मार्गी लावला आहे. कर्जत-जामखेड बसस्थानके मॉडेल करू. मतदारसंघातील स्थळे पर्यटनस्थळांसाठी निधी कमी पडून देणार नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी केले. 

Web Title: Take care of development works, Ajit Pawar's warning

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com