भाजपच्या तीन आमदारांचा पत्ता कट

 भाजपच्या तीन आमदारांचा पत्ता कट

पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शहरात धक्कातंत्र वापरले असून, कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना, तर विजय काळेंच्या जागी सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी मिळाली. कुतूहल असलेल्या कसब्यातून उमेदवारी मिळविण्यात महापौर मुक्ता टिळक यशस्वी झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले. 

तीन विद्यमान आमदारांना घरी बसविण्यात येणार असल्याच्या शक्‍यतेमुळे भाजपमधील वातावरण ढवळून निघाले आहे; तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या घोषणेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेला शहरात एकही जागा भाजपने सोडलेली नाही. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. 

मतदानाला तीन आठवडे राहिले असले तरी, अद्याप प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्‍चित झालेले नाहीत. तसेच आघाडीचे झाले आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. खडकवासल्यातून भाजपचे भीमराव तापकीर, हडपसरमधून योगेश टिळेकर, वडगाव शेरीतून जगदीश मुळीक यांना आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यात यश आल्याचे समजते. पालकमंत्री पाटील यांची कोथरूड या ‘सेफ’ मतदारसंघातील उमेदवारी पचविणे कार्यकर्त्यांना जड जात आहे. शिवसेनेला जागा न मिळाल्यामुळे माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे पक्षांतर करतील, अशी चर्चा आहे; तर कोथरूडमध्ये पाटील यांच्यासमोर विरोधी पक्षांचा सक्षम उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कसब्यातील उमेदवारीसाठी तुल्यबळ स्पर्धा असताना महापौर टिळक यशस्वी ठरल्या आहेत, तर सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे यांची उमेदवारी अपेक्षित होती, असे भाजप वर्तुळातून सांगण्यात येत आहे. 

आघाडीमध्ये कसबा, कॅंटोन्मेंट आणि शिवाजीनगरमधून काँग्रेस; तर हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी आणि पर्वतीमधून राष्ट्रवादी निवडणूक लढविणार आहे. कोथरूड मित्रपक्षाला देण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली असली तरी, त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. काँग्रेसने फक्त रमेश बागवे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. 

मनसे लढविणार आठही जागा...


शिवसेनेला एकही जागा शहरात मिळणार नसल्यामुळे त्यांचे प्रमुख कार्यकर्ते बंडाच्या पवित्र्यात आहेत; तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आठही जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली असली तरी, त्यांचेही उमेदवार जाहीर झालेले नाहीत. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, आप यांनी काही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, युती व आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यावर उर्वरित जागांवरील त्यांचे उमेदवार जाहीर होतील.


Web Title: Three BJP MLAs do not get nomination in Pune constituency

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com