दोन तलवार नेते जेव्हा एकमेकांना भेटतात आणि त्यांच्यातला वादच विसरुन रंगतो गप्पांचा फड

साम टीव्ही
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

साताऱ्याच्या दोन तालेवार नेत्यांमध्ये दिलजमाई झाल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. याला कारण ठरली ती उदयनराजे आणि रामराजे निंबाळकरांमध्ये झालेली भेट.

साताऱ्याच्या दोन तालेवार नेत्यांमध्ये दिलजमाई झाल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. याला कारण ठरली ती उदयनराजे आणि रामराजे निंबाळकरांमध्ये झालेली भेट.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील विळ्याभोपळ्याचं सख्य अवघ्या महाराष्ट्राला ठावूक आहे. उदयनराजे राष्ट्रवादीत असताना तर त्यांच्या या वादाचा पक्षनेतृत्वालाही मनस्ताप झाला होता. पण शनिवारी अचानक हे दोन्ही राजे आमनेसामने आले आणि या दोघांनी चक्क एकमेकांशी गप्पा मारल्या. 

पाहा व्हिडिओ -

त्याचं झालं असं की, शनिवारी जिल्हा बँकेची सभा उरकून रामराजे नाईक निंबाळकर शासकिय विश्रामगृहात थांबले होते. दरम्यान संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास, शासकिय विश्रामगृहात अचानक खासदार उदयनराजे भोसले दाखल झाले. पोर्चमध्ये येताच त्यांनी विश्रामगृहात कोण थांबलंय अशी विचारणा केली. रामराजे असल्याचं समजताच उदयनराजे थेट रामराजेंच्या सुटमध्ये गेले. दोघांनीही एकमेकांचं हसत स्वागत केलं. शिवाय दोघांमध्ये पाच सात मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर ‘टेक केअर, लवकरच भेटू’ असं म्हणत उदयनराजेंनी रामराजेंचा निरोप घेतला. रामराजेंनीही 'काळजी घ्या' असं म्हणत उदयनराजेंचा निरोप घेतला. 

यापुर्वी उदयनराजेंनी फलटणमध्ये जाऊन, तर रामराजेंनी साताऱ्यात येऊन एकमेकांची उणी - दुणी काढलीत. संस्थानिकांचे संस्थानिक म्हणून निंबाळकर घराण्याचा मोठा मान आहे. तर खुद्द छत्रपतींचे वारसदार म्हणून उदयनराजेंचा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात दबदबा आहे. त्यामुळे या दोन्ही तालेवार नेत्यांची दिलजमाई होत असल्यास त्याचं समर्थकांकडून स्वागतच होईल.


संबंधित बातम्या

Saam TV Live