राजेंचे 'एप्रिल फुल' तर होणार नाही ना?

सरकारनामा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

उदयनराजेंना राज्यसभेवर घेतले जाईल. त्यानंतर केंद्रातील मंत्रीपद दिले जाणार आहे. यासाठी खुद्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. त्यामुळे उदयनराजेंना तीन एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

सातारा : लोकसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उदयनराजे भोसले यांना पुन्हा खासदार करून मंत्रीपद देण्याबाबत भाजप नेतृत्व आग्रही आहे. त्यानुसार येत्या तीन एप्रिलला राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत आहेत. यापैकी एका जागेवर उदयनराजेंना घेतले जाणार आहे.  

सातारा लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी तीन महिन्यांतच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. मतदारसंघाच्या विकासाचे कारण सांगून त्यांनी पक्ष बदलला. मात्र पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला. उदयनराजे पोटनिवडणुकीत अडचणीत होते, हे सर्वजण जाणून होते. तरीही त्यांच्या समर्थकांच्या अट्टाहसापायी त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला पण उदयनराजे खासदार होऊ शकले नाहीत. ही लोकसभा निवडणुकीतील भरपाई करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून उदयनराजेंना सन्मानाने राज्यसभेवर घेऊन  केंद्रात मंत्रीपद देण्याची भुमिका तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडूनही होकार मिळाला आहे. पण राज्यसभेच्या जागा रिक्त होईपर्यंत राजेंना थांबावे लागणार आहे. तीन एप्रिलमध्ये राज्यसभेच्या सात जागा रिक्त होतील. त्यावेळी उदयनराजेंना राज्यसभेवर घेतले जाईल. त्यानंतर केंद्रातील मंत्रीपद दिले जाणार आहे. यासाठी खुद्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. त्यामुळे उदयनराजेंना तीन एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

एप्रिल महिन्यातील एखाद्याला आश्‍वासन मिळाले की सर्वांची बोटे तोंडात जातात. कारण एप्रिल फुल होऊ शकते. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनाही एप्रिल महिन्याचेच आश्‍वासन भाजपकडून मिळालेले आहे. त्यामुळे त्यांचा एप्रिल फुल होणार की वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live