खूपच प्रेरणादायी! पेंडूरच्या तरुणांनी काय केले वाचा...

खूपच प्रेरणादायी! पेंडूरच्या तरुणांनी काय केले वाचा...

वैभववाडी  (सिंधुदुर्ग) -  "एकमेका साह्य करू'चा मंत्र अंगिकारत पेंडूर (ता. मालवण) येथील तरुणांनी शेतीतून समृद्धीचा "पेंडूर पॅटर्न' निर्माण केला आहे. शेतीसाठी आवश्‍यक सोयीसुविधा गावात नसतानाही तरुणांनी मल्चिंग, ठिंबक सिंचनाचा वापर करीत 100 एकर जमीन कलिंगड लागवडीखाली आणली आहे. निव्वळ कलिंगड शेतीतून 3 कोटींची आर्थिक उलाढाल होत आहे.

रासायनिक खतांचा अवास्तव वापर टाळत त्यांनी जीवामृत आणि एकात्मिक कीड नियंत्रणावर भर दिला आहे. याशिवाय श्री पद्धतीने भातशेती करीत उत्पादन क्षमताही वाढविली आहे. नोकरीसाठी शहरांकडे धावणाऱ्या तरुणाला पेंडूरमधील युवकांनी शेतीबाबत एक सकारात्मक संदेश दिला आहे. 
मालवण तालुक्‍यातील पेंडूर हे गाव जिल्ह्यातील इतर गावांप्रमाणेच. गावातील बहुतांश क्षेत्र सहा महिने अती पाण्यामुळे दलदलसदृश असते. त्यामुळे या जमिनीत भातशेतीव्यतिरिक्त अन्य पिके पावसाळ्यात घेता येत नाहीत.

तेथे पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे गावात फळ बागायती यशस्वी होत नाहीत; परंतु गावातील तरुणांनी नैसर्गिक स्थितीचा अभ्यास करून तीन महिन्यांचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कलिंगडची निवड केली. सुरुवातीला पाटाने पाणी देऊन कलिंगड केले जात होते; परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत बदल करण्यात आला. पाच-सहा वर्षांपासून मल्चिंग, ठिबक सिंचनाचा वापर करीत गावातील सुमारे 100 एकर क्षेत्र कलिंगड लागवडीखाली आणले आहे. 

नोव्हेंबरमध्ये कलिंगडाची लागवड केली जाते. त्यासाठी शेणखत, लेंडीखत, जीवामृताचा वापर करून रासायनिक खतांवरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न येथील शेतकऱ्यांनी केला आहे. नांगरणी, कलिंगड बी घालणे ते काढणीपर्यंत हे सर्व शेतकरी एकत्रितपणे काम करतात. त्यामुळे एकमेकाला मदत करीत असल्यामुळे शेतकऱ्यांचा मजुरांवरील खर्चदेखील कमी होतो. येथील प्रत्येक शेतकरी साधारणपणे एकरी 22 टन उत्पादन घेतो.

या उत्पादनाला सरासरी 10 रुपये दर मिळतो. त्यातून तीन कोटींपेक्षा अधिक उलाढाल फक्त कलिंगड व्यवसायातून होते. शेतकऱ्यांच्या उत्तम नियोजनामुळे येथील फळाला चांगला आकार, चव आणि रंग वैशिष्ट्यपूर्ण येतो. त्यामुळे येथील कलिंगडाला गोवा, बांदा, चिपळूण, रत्नागिरी आदी ठिकाणच्या विविध भागांत मोठी मागणी आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन व्यापारी फळे घेऊन जातो. 

शेतीत कष्ट करण्याची तयारी, नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि एकमेकाला सहकार्याची भूमिका यामुळे या गावातील तरुण शेतकरी अवघ्या 75 ते 80 दिवसांत दोन, तीन, तर कुणी दहा लाखांपर्यंत उत्पन्न घेतो. प्रत्येक शेतकरी कलिंगड पिकांमुळे सधन होताना दिसत आहे. शेतात राबल्यानंतर हातात पैसा खेळतो, याचा प्रत्यय येत असल्यामुळे तरुणाई नोकरीच्या मागे न धावता शेतीकडे वळू लागली आहे. त्यामुळे "पेंडूर पॅटर्न' जिल्ह्यासाठी सकारात्मक संदेश मानला जात आहे. 

उन्हाळी कलिंगडाचे पीक घेतल्यानंतर पावसाळी श्री पद्धतीने भातशेती केली जाते. गावातील मोठ्या प्रमाणात क्षेत्र श्री भात लागवडीखाली आहे. त्यामुळे गावाची उत्पादन क्षमता गुंठ्याला 120 किलो आहे. शेतीपूरक दुग्ध व्यवसायावरदेखील तरुणाईचा कल असून गावचे दूध संकलन प्रतिदिन 300 लिटर आहे. शेतीतून समृद्धी साधलेल्या पेंडूरची दखल राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक सी. जी. बागल, तालुका कृषी अधिकारी व्ही. जी. गोसावी यांनी घेत त्यांनी नुकतीच गावाला भेट दिली. कलिंगड शेतीची पाहणी करून त्यांनी शेतीत तरुणाई राबत असल्यामुळे त्यांची तोंड भरून प्रशंसा केली. 

ठिबक सिंचनसाठी पॉवर ट्रिलरचा वापर 
ज्या ठिकाणी पेंडूर येथील शेतकरी कलिंगडाची शेती करतात त्या ठिकाणी वीज उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या पॉवर ट्रिलरला विशेष पंखा जोडून त्याचा ठिबक सिंचनासाठी वापर केला आहे. साधारणपणे 17 ते 18 शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने केलेली पाण्याची व्यवस्था थक्क करणारी आहे. 

शेतकरी गटातून विकासाची वाट 
गावातील तरुणांनी चार शेतकरी गट तयार केले आहेत. या गटाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना ते गावात राबवित आहेत. शेतीसाठी त्याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. हे शेतकरी एकात्मिक कीड नियत्रंण करीत असल्यामुळे त्याचा चांगला परिणाम होत आहे. 

कलिंगड पीक अर्थकारण 
- गावाचे कलिंगड लागवडीखालील क्षेत्र-100 एकर 
- एकरी उत्पादन-22 टन 
- मिळणारा दर-सरासरी 10 रुपये प्रतिकिलो 
- एकरी खर्च -60 ते 65 हजार 
- सरासरी एकरी उत्पन्न- 2 लाख 20 हजार 
- खर्च वजा जाता निव्वळ नफा-1 लाख 55 हजार 
- सरासरी - अडीच ते तीन कोटी रुपये. 

गावातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. महात्मा गांधी योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, चांदा ते बांदा गट यांत्रिकी योजना, मसाला पीक लागवड योजना, कोकम लागवड, पीक प्रात्यक्षिक लागवड, श्री पद्धत भात लागवड आदी योजना राबविण्यावर भर देण्यात आला आहे. 
- सुमित राजेंद्र भुवर, कृषी सेवक, पेंडूर

दहा-पंधरा वर्षांपासून गावात कलिंगडाची शेती केली जात आहे. या शेतीतून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे. प्रत्येक शेतकरी शेतीतील बदल स्वीकारत आहे. ते ठिबक सिंचन, मल्चिंग वापर, एकात्मिक कीड रोग नियंत्रण करू लागले आहेत. कलिंगड लागवडीमुळे शेतकरी सधन होऊ लागला आहे. 
- सत्यवान सावंत, शेतकरी, पेंडूर

WEB TITLE- Very inspiring! Read what Pandoor's youth did ...

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com