VIDEO | वनविभाग करणार बिबट्याचं सर्वेक्षण

साम टीव्ही 
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

 

  • यंदा राज्यात 159 बिबट्यांनी गमावला प्राण 
  • दशकातील सर्वाधिक 23 व्यक्तिंचाही हल्ल्यात बळी
  • वनविभाग करणार बिबट्यांचं सर्वेक्षण 

 यंदाच्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान राज्यात तब्बल 159 बिबट्यांचा मृत्यू झालाय. मागील 5 वर्षांमधील ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. बिबट्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढल्यानं चिंता वाढलीय. विशेष म्हणजे बिबट्याच्या हल्ल्यानं मृत्यू झालेल्या लोकांचं प्रमाणही वाढलंय.

बिबट्या कुठेतरी लोकवस्तीत शिरला, बिबट्या कुणाच्या तरी शेतातील विहिरीत पडला अशा बातम्या आपण रोज पाहतो किंवा ऐकत असतो. पण याच बिबट्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढत चालल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. यंदाच्या वर्षात तब्बल 159 बिबट्यांनी आपला प्राण गमावलाय. प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी अलिकडेच जो अहवाल प्रसिद्ध केलाय त्यातून ही माहिती पुढे आलीय. 

यातील 80 बिबट्यांचा नैसर्गिक मृत्यू झालाय. तर 64 बिबटे रस्ता ओलांडताना किंवा रेल्वे ओलांडतांना मरण पावले आहेत. तर उर्वरीत शिकारीदरम्यान मृत्यू झाल्याची नोंद यंदाच्या अहवालात करण्यात आलीय. याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

ही आकडेवारी एव्हढ्यापुरताच मर्यादित नसून बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांच्या आकडेवारीतही यंदा वाढ झालीय. यंदाच्या वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्यांची संख्या 23 इतकी आहे. दशकातील ही सर्वोच्च नोंद असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान बिबट्यांच्या वाढत्या मृत्यूबाबत वनविभागानेही चिंता व्यक्त केलीय. बिबट्यांची शिकार रोखण्यासाठी वनविभागानं सर्वेक्षण करणार असल्याचं म्हंटलंय. जिथं जिथं बिबट्यांच्या संशयास्पद मृत्यूची नोंद झालीय असे हॉटस्पॉट निर्धारित करण्यात आले असल्याचंही वनविभागाकडून सांगण्यात आलंय. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघ, बिबटे यासारखे प्राणी अतिशय महत्वाचे आहेत. एका वर्षात बिबट्यांच्या मृत्यूची वाढलेली संख्या निश्चितच चिंतेत वाढ करणारी आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live