VIDEO | जीवघेण्या कोरोनानं घातला जगाच्या खिशात हात, अर्थव्यवस्थेला मोठा फटका

ब्युरो रिपोर्ट
मंगळवार, 17 मार्च 2020

कोरोना व्हायरसच्या धक्क्यानं जागतिक अर्थव्यवस्थेला मोठं भगदाड पडलंय.विमान कंपन्या, हॉटेल्स आणि ट्रॅव्हल इंडस्ट्रीला कोरोनानं मोठा फटका दिलाय. जगात शेकडो जीव घेतलेला कोरोना येत्या काही दिवसांत अनेक नोकऱ्याही गिळंकृत करेल अशी चिन्हं निर्माण झालीयत.प्रत्येकाच्या तोंडाला मास्क लावणाऱ्या कोरोनानं भारतासह जगाच्या अर्थव्यवस्थेचे पाय कसे बांधलेत

 

 काय करायचं या कोरोनाचं? असा हतबल सवाल जगातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय. प्रश्न प्रत्येकाच्या जीवाचाय ना? मग कुणीही कासावीस होणारच. पण आता कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय आणि नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची चिन्हं आहेत. प्रत्येकांच्या तोंडाला मास्क लावणाऱ्या या कोरोनानं भारतासह जगाच्या अर्थव्यवस्थेची अक्षरश: मुस्कटदाबी केलीय.

कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांतील शेअर बाजारांनी वारंवार आपटी खाल्लीय.  त्याचबरोबर पर्यटन व्यवसाय, विमान कंपन्या, ट्रॅव्हल्स कंपन्या, हॉटेल व्यवसाय आर्थिक संकटांच्या खाईत लोटले गेलेयत. भारतातील इंडिगो विमान कंपनीने गेल्या काही दिवसांत 20 ते 25 टक्के विमानसेवा रद्द केल्यात. अटलांटाची विमान कंपनी डेल्टा एअर लाईन्सने 40 टक्के उड्डाणं रद्द केलीयत. त्याचसोबत पर्यटन क्षेत्रातील 16 टक्के नोकऱ्यांवर टांगती तलवार येण्याची शक्यताय. या सगळ्या संकटांतून बाहेर पडण्यास पर्यटन क्षेत्राला वर्षभराचा कालावधी लागू शकतो असाही अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

ही सगळी अवस्था बघता जगाच्या डोक्याला ताप ठरलेल्या कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाच हुडहुडी भरलीय असं म्हटलं तर ती आतिशयोक्ती ठरणार नाही


संबंधित बातम्या

Saam TV Live