VIDEO | 80 वर्षांचा नवरदेव आणि 68 वर्षांची नवरी

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक
मंगळवार, 3 मार्च 2020

ही लगीनघाई उडालीय सिन्नरच्या हिवरे गावात... इथं-तिथं लग्न होत असतातच, त्यात काय विशेष? असं तुम्ही म्हणाल... पण आम्ही तुम्हाला एका अशा विलक्षण लग्नात घेऊन चाललोय, जिथं दोन जीवांची लगीनगाठ बांधलीय आयुष्याच्या संध्याकाळी... कारण इथला नवरदेव आहे 80 वर्षांचा आणि नवरी आहे 68 वर्षांची... निवृत्ती आणि सुमनबाई यांच्या विवाह सोहळ्यात ही धांदल उडालीय. त्याचं झालंय असं, की पोस्टातून रिटायर झालेल्या निवृत्ती यांचा एकुलता एक मुलगा दहा वर्षांपासून बेपत्ताय... त्यामुळे ते घरी एकटेच असतात आणि दोन्ही मुलींची लग्न झाल्याने सुमनबाईंजवळही कुणीच राहात नाही. दोघेही आपापल्या घरी एकटेच राहात होते... चहूबाजूंनी वेढलेल्या एकाकी बेटासारखे... मात्र हे एकाकीपण झिडकारण्यासाठी सुमनबाईंच्या पुतण्याच्या पुढाकाराने ही लगीनगाठ बांधली गेलीय.

विवाहसोहळ्याला वधू-वरांकडचे वऱ्हाडी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते... विवाहाचे विधी संपन्न झाल्यावर निवृत्ती आणि सुमनबाईंनी एकमेकांना हार घातले तेव्हा मांडवात टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रत्येकांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि वधु-वराच्या चेहऱ्यावरून समाधान ओघळत होतं. वयामुळे थकलेलं शरीर, मनाचं घुसमटलेपण आणि त्यातच अंगावर येणारं एकाकीपण ही आपल्या समाजातली मोठी समस्या बनून गेलीय. पण निवृत्ती आणि सुमनबाईंनी या वयात लग्नाचं पाऊल उचलून नव्या विचारांना तारुण्य बहाल करत आयुष्याची काळवंडलेली संध्याकाळ सोनेरी करून टाकलीय. असंच म्हणावं लागेल.

WebTittle :: VIDEO | Husband, 80, and WIFE, 68


संबंधित बातम्या

Saam TV Live