VIDEO | बाळाला टाकणाऱ्या आईला पुन्हा मायेचा पान्हा, पाहा काय झालय नेमक

साम टीव्ही
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

बाळाला टाकणाऱ्या आईला पुन्हा मायेचा पान्हा
रस्त्यावर फेकलेल्या मुलीसाठी आईची वणवण
पोलिसांकडून पोटच्या बाळाला घेतलं पुन्हा कुशीत

आता इशी एक बातमी. जी तुमचे डोळे पाणावेल. आणि पोटच्या बाळांना रस्त्यावर फेकणाऱ्यांचे डोळे खाडकन उघडतील.  या आईनंही बाळाला रस्त्यावर फेकलं. पण काही क्षणातच तिच्या मातृत्वाला पान्हा फुटला. पाहूयात अंबरनाथची ही हृदयद्रावक घटना.

 डोळे किलकिले करत बघणारं हे निरागस बाळ काही काळाआधी रस्त्याकडेला हंबरडा फोडत पडून होतं. जगात पाऊल ठेवताक्षणीच त्याच्या नशिबी वेदना आणि निव्वळ आक्रोश. जन्मदात्या आईनंच या बाळावर ही वेळ आणली होती. पण तिचा तरी काय दोष म्हणा. अठराविश्व दारिद्र्य पाचवीला पुजलेलं. गरोदर मातेला आणि जन्माला येणाऱ्या बाळाला कसं सांभाळायचं म्हणून नातेवाईकांनी तिला घराबाहेर काढलं.  घटना आहे अंबरनाथची. शेवटी तिनं या बाळाला रस्त्याकडेला जन्माला घातलं. आणि तिथंच सोडून दिलं.  तिला कुणीतरी चांगल्या घरातला माणूस घेऊन जाईल आणि तिला सुखाचं आयुष्य मिळेल म्हणून.  बाळाला असं सोडून दिलं तरी तिचा जीव कासावीस होत होता. आईचंच काळीज ते. हंबरडा फोडणाऱ्या बाळाकडे ती लांबून कोपऱ्यात उभं राहून बघत राहिली. अंबरनाथ पोलिस आले. बाळाला घेऊन गेले.

पोलिस बाळाले घेऊन गेले खरं. पण तिचं पुढं काय होणार या चिंतेनं तिचं काळीज धडधडू लागलं. काही क्षणांपूर्वी आपल्याच पोटी जन्माला आलेल्या बाळाचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोरून हटता हटेना. इतक्यात पोलिसांची गाडी दिसली आणि ही माय गाडीला आडवी आली. माझं बाळ मला द्या असा गहिवर तिने मांडला. पोलिसांनी आवश्यक तो सर्व तपास केला.  खात्री पटल्यावर हे निरागस बाळ आईच्या कुशीत विसावलं.

पोटच्या बाळाला रस्त्यावर टाकणं गैरच. त्याचं समर्थन होऊच शकत नाही. पण, गरिबी माणसाला काय करायला लावेल याचा नेम नाही. तरीही गरिबी-श्रीमंतीचे भेद उन्मळून टाकणारी मायेची ओल काही केल्या आटत नसते. हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. पोटच्या गोळ्याला रस्त्यावर टाकून अमानुषपणे निघून जाणाऱ्यांच्या डोळ्यांत हे आईच्या मायेचं अंजन नक्कीच लागायला हवं.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live