VIDEO | उर्मिला मातोंडकरांवरुन विरोधकांचे टीकेचे ताशेरे

साम टीव्ही 
बुधवार, 2 डिसेंबर 2020
  • उर्मिला मातोंडकरांच्या हाती शिवबंधन 
  • आमदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा 
  • शिवसेनेत मातोंडकर नव्हत्या का? 

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने अखेर मुख्यमंत्री ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलंय. शिवसेना पक्षप्रवेशासोबत त्यांचा आमदारकीचा मार्गही मोकळा झाल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेत निष्ठावंतांना डावललं जात असल्याचा सूरही उमटू लागलाय. 

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत अखेर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या गोटात दाखल झाल्या आहेत. मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत रश्मी ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत उर्मिला मातोंडकरांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेना प्रवेशासोबत उर्मिला मातोंडकर यांचा विधानपरिषद प्रवेशही निश्चित झाल्याची चर्चा आहे. 

 विरोधकांनी मात्र उर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशावरून जोरदार टीका केलीय. पक्षासाठी काहीही योगदान नसलेल्या मातोंडकरांना शिवसेना आमदार करेल मात्र त्याचबरोबर सेनेच्या खऱ्या रणरागिणींच्या योगदानाकडे दुर्लक्ष करू नका असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी लगावलाय. 

उर्मिला मातोंडकरांच्या सेना प्रवेशामुळे शिवसेनेतील निष्ठावंत कार्यकर्त्या दुखावल्याची चर्चा देखील आहे. मुळात शिवसेनेत कलाकारांची कमतरता नाही. आजच्या घडीला शिवसेनेत शेकडो मातोंडकर असताना, उर्मिला मातोंडकरच का? असा सवाल उपस्थित होणं स्वाभाविक आहे. बाळासाहेबांनी तळागाळातल्या शिवसैनिकाला मोठ्यातलं मोठं पद देऊन त्याच्या निष्ठेचा आदर राखला. मात्र नव्या पिढीच्या कारभारात जर बाहेरून आलेल्यांसाठी पक्षात पायघड्या अंथरल्या जात असतील तर निष्ठावंतामधली कुरबूर वाढणं स्वाभाविक आहे. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live