भारतात घुसखोरीसाठी केलेल्या पाकच्या कुरापतीचा पर्दाफाश

साम टीव्ही 
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020
  • भारतात घुसखोरीसाठी पाकिस्ताननं खोदला 200 मीटर लांबीचा बोगदा
  • भारतीय लष्करानं केला जैशच्या दहशतवाद्यांचा खात्मा
  • लष्कराच्या सतर्कतेमुळे पाकच्या नापाक मनसुब्यांवर पाणी

भारतात दहशतवादी घुसवून मोठा हल्ला करण्याचा पाकिस्तानचा डाव भारतीय सैन्यानं हाणून पाडलाय.अलिकडेच भारतीय लष्करानं नागरोटामध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. इतकच नाही तर हे दहशतवादी पाकिस्तानातून भारतात कसे शिरले? याचाही शोध भारतीय लष्करानं घेतलाय.

सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. भारतात दहशतवादी घुसवून मोठा घातपात घडवण्याचा मोठा डाव भारतीय लष्करानं उधळून लावलाय. 19 नोव्हेंबरला भारतीय जवानांनी जीवावर खेळात नागरोटामध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. हे चारही दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे असल्याचं सांगण्यात येतंय. 

भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एका बोगद्यातून हे दहशतवादी भारतीय हद्दीत दाखल झाले होते.   हा बोगदा जवळपास 200 मीटर लांब आणि आठ मीटर खोल आहे. विशेष म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हा बोगदा तयार करण्यात आला होता. याचाच अर्थ या बोगद्याच्या निर्मितीत पाकिस्तानी अधिकाऱ्यांचा मोठा हात असू शकतो. 

विशेष म्हणजे ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांजवळ तैवानमध्ये निर्मिती करण्यात आलेलं एक जीपीएस उपकरणही होतं. त्याच्या मदतीनं ते भारतीय सीमेत घुसले. भारतीय यंत्रणांनी जीपीएसच्या मदतीनं दहशतवाद्यांना ट्रॅक केलं. बोगदा पार केल्यानंतर दहशतवादी 12 किलोमीटर आतपर्यंत घुसले होते. मृत्यूपूर्वी या दहशतवाद्यांनी जीपीएस उपकरणावरील डाटा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. मात्र सुरक्षा यंत्रणांनी तो डाटा रिकव्हर केला.

भारतीय लष्कराच्या सतर्कतेमुळे पाकिस्तानच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं गेलंय. सीमेपलिकडून पाकनं कितीही कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्याच भाषेत उत्तर मिळेल हेच भारतीय जवानांनी दाखवून दिलंय. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live