VIDEO| 26 /11 च्या हल्ल्यानंतरही पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर

साम टीव्ही
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020
  • राज्यात सायबर लॅब आल्या; पण बॉम्बनाशक पथके गायबच 
  • मुंबई पोलिसांचे चार प्रस्ताव सरकारी लाल फितीत 
  • 26/11च्या हल्ल्यानंतरही पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर 

मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्ष उलटली. मात्र आजही तो हल्ला आठवला की अंगाचा थरकाप उडतो. कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यात करकरे, कामटे, साळसकर, ओम्बले यांच्यासारखे शूरवीर पोलिस दलाने गमावले. पण अजूनही पोलिस दल सुरक्षित आहे असं म्हणता येणार नाही. पाहुयात साम टिव्हीचा स्पेशल रिपोर्ट. 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 मध्ये दहा दहशतवाद्यांनी हल्ला करत सुरक्षा व्यवस्थेचे एक प्रकारे वाभाडेच काढले होते. हल्ल्यानंतर खडबडून जाग झालेल्या राज्य सरकारनं शहराच्या सुरक्षेकरिता त्वरित पावलं उचलण्यास सुरुवात केली. सुरक्षेसाठी नेमलेल्या राम प्रधान समितीनं राज्यात 20 ठिकाणी बॉम्बनाशक पथकांची आवश्‍यकता असल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. 12 वर्षांत राज्यात 46 ठिकाणी सायबर लॅब आल्या मात्र  बॉम्बनाशक पथकं अद्याप स्थापनच झालीच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलय. मुंबई पोलिसांचे त्याबाबतचे चार प्रस्ताव सरकारी लाल फितीत अडकले आहेत. 

भविष्यात अशा पकारचा हल्ला होऊ नये, यासाठी राम प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. त्यानुसार तत्कालीन सरकारनं राज्यातील बॉम्बनाशक आणि संबंधित यंत्रणा मजबूत करण्यासाठी पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक प्रस्ताव मागवला. महाराष्ट्रातील 20 संवेदनशील जिल्ह्यांमध्ये बॉम्बनाशक पथकांची स्थापना करण्यात यावी, असा प्रस्ताव 31 मार्च 2009 रोजी राज्य गृहमंत्रालयाकडे पाठवला. गृहमंत्रालयानं त्याला जुलै 2009 मध्ये तात्काळ मंजुरी देत 8 कोटींचा निधीही उपलब्ध करून दिला. मात्र, त्यादृष्टीने अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. 

राज्यात 2014 मध्ये सत्ताबदल झाले. त्यानंतर शिवसेना-भाजप सरकारकडून तरी प्रस्तावाला अपेक्षित प्रतिसाद मिळेल, अशी आशा पोलिस विभागाला होती. मात्र प्रस्तावावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. राज्यात सायबर लॅबचा धडाका सुरूय. त्यानुसार 46 ठिकाणी सायबर लॅबचं उद् घाटनही झालय. मात्र सायबर लॅबकडून अद्याप म्हणावी तशी प्रगती नाही. 

तर पाठपुरावाही बॉम्बनाशक पथकाबाबत सरकारने काहीच पावले उचललेली नाहीत. त्यामुळे जनतेच्या रक्षणाची जबाबदारी ज्या पोलिस दलाच्या खांद्यावर आहे, त्याच पोलिसांची सुरक्षा वारयावर आहे अशीच सध्याची गत म्हणता येईल.


संबंधित बातम्या

Saam TV Live