कणकवली मतदारसंघ पुन्हा एकदा लक्षवेधी 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

कणकवली - अवघ्या एका दिवसावर आलेला राणेंचा भाजप प्रवेश आणि राणेंचे खंदे शिलेदार सतीश सावंत यांनी राणेंपासून घेतलेली फारकत यामुळे कणकवली मतदारसंघ पुन्हा एकदा लक्षवेधी ठरला आहे. येथे आमदार नीतेश राणे आणि सतीश सावंत यांच्यात थेट लढतीची शक्‍यता आहे. भाजप आणि राणेसमर्थक तर दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि सावंत समर्थक यांची ताकद पणाला लागण्याची शक्‍यता आहे . 

कणकवली - अवघ्या एका दिवसावर आलेला राणेंचा भाजप प्रवेश आणि राणेंचे खंदे शिलेदार सतीश सावंत यांनी राणेंपासून घेतलेली फारकत यामुळे कणकवली मतदारसंघ पुन्हा एकदा लक्षवेधी ठरला आहे. येथे आमदार नीतेश राणे आणि सतीश सावंत यांच्यात थेट लढतीची शक्‍यता आहे. भाजप आणि राणेसमर्थक तर दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि सावंत समर्थक यांची ताकद पणाला लागण्याची शक्‍यता आहे . 

2014 च्या लढतीत कणकवली मतदारसंघातून आमदार नीतेश राणे कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आले. त्यानंतर नारायण राणेंच्या जुन्या शिलेदारांशी त्यांचे फारसे सख्य राहिले नाही. त्यांनी आपली स्वतंत्र टिम बांधण्यावर भर दिला. हळूहळू राजन तेली, काका कुडाळकर, संजय पडते आदींनी राणेंची साथ सोडली. आता राणेंचे उजवे हात मानले जाणारे सतीश सावंत यांनीही राणेंशी काडीमोड घेतला आहे. 

सावंत 2009 पासूनच आमदार होण्यासाठी इच्छुक होते. राणेंकडूनही त्यांना तसा शब्द देण्यात आला; पण 2009 मध्ये रवींद्र फाटक यांना तर 2014 मध्ये नीतेश राणे यांना कणकवलीतून उमेदवारी मिळाली. आता राणे भाजपमध्ये जाणार असल्याने कणकवली मतदारसंघात पुन्हा नीतेश राणे हेच भाजपचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सतीश सावंत यांना कात्रजचा घाट दाखविण्याचा प्रयत्न होण्याची शक्‍यता होती. यावेळी मात्र सावंत यांनी आधीच सावध होत राणेंपासून फारकत घेतली आहे. 

श्री. सावंत यांच्यापुढे आता शिवसेना पर्याय आहे; मात्र शिवसेना-भाजप युती होणार असल्याने कणकवली मतदारसंघातून सावंत आपले समर्थक आणि शिवसेनेच्या पाठबळावर अपक्ष निवडणूक लढण्याची शक्‍यता आहे. त्यांची थेट लढत नीतेश राणे यांच्याशी असेल असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. 

कणकवलीसह जिल्ह्यात सावंत यांचा दांडगा जनसंपर्क आहे. शेती आणि सहकाराच्या माध्यमातून ते अनेक संस्थांशी जोडले गेले आहेत. सतीश सावंत आमदार होण्यासाठी त्यांच्या समर्थकांची फौज गेले दोन वर्षे मेहनत घेत आहे. त्यामुळे सावंत शिवसेनेच्या उमेदवारीवर किंवा अपक्ष लढले तर त्यांचे कडवे आव्हान आमदार राणे यांच्यापुढे असणार आहे. 

राजकीय हालचाली गतिमान 
सतीश सावंत यांनी राणेंची साथ सोडल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यासह सिंधुदुर्गातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. शिवसेनेकडूनही वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. याखेरीज सतीश सावंत कणकवली मतदारसंघातून लढत असतील तर एकास एक उमेदवार देऊन राणेंना शह देण्यासाठीही इतर पक्षांकडून चाचपणी केली जात आहे.  

 

Web Title: Vidhan Sabha 2019 Rane Sawant fight in Kankavali
 


संबंधित बातम्या

Saam TV Live