विधानसभा निवडणूक होणार ‘ईव्हीएम’वरच

 विधानसभा निवडणूक होणार ‘ईव्हीएम’वरच


मुंबई - निवडणुकीसाठी मतदानपत्रिका इतिहासजमा झाली असून, राज्यातील विधानसभा निवडणुका इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रांवरच (ईव्हीएम) घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्‍त सुनील अरोरा यांनी आज स्पष्ट केले. उमेदवारी खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्याचा सध्यातरी विचार नसून विधानसभा निवडणुकांच्या तारखा दिल्लीतील पत्रकार परिषदेत घोषित होतील, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्‍त सुनील अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील पथक महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत निवडणूक आयुक्‍त अशोक लवासा, सुशीलचंद्र उपस्थित होते. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आढाव्याची माहिती दिली.

महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी विधानसभा निवडणूक ‘ईव्हीएम’वर नको, तर जुन्या पद्धतीने मतपत्रिकांवरच घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. निवडणूक आयुक्‍तांच्या भेटीदरम्यानही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी हीच मागणी केली. मात्र, मतपत्रिका आता इतिहासजमा झाल्या आहेत. ‘ईव्हीएम’वरच मतदान होणार असल्याचे सुनील अरोरा यांनी स्पष्ट केले. ‘‘ईव्हीएममध्ये बिघाड होऊ शकतो. पण, त्यात कोणताही बदल करता येणे शक्‍यच नाही. अगदी सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे ‘ईव्हीएम’वर कोणत्याही प्रकारे संशय घेता येत नाही. ते एक परिपूर्ण यंत्र आहे. त्यामुळे आता पाठीमागे जाण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही,’’ असे अरोरा म्हणाले. गेल्या दहा वर्षांत उमेदवारी खर्चाच्या मर्यादेत कोणतीच वाढ झालेली नाही. सध्या वाढलेली महागाई लक्षात घेता उमेदवारी खर्चाच्या मर्यादेत वाढ करावी, अशी मागणी काही पक्षांनी केली. पण, त्याचवेळी काही पक्षांच्या प्रतिनिधींनी उमेदवारी खर्चात वाढ करू नये, अशीही विनंती केल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सध्यातरी उमेदवारी खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्यात येणार नसल्याचेही अरोरा यांनी स्पष्ट केले.


Web Title: Vidhansabha Election 2019 on EVM Machine Sunil Arora

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com