सर्वांत तरुण सरपंचाची कमाल ! असे केले गाव कोरोनामुक्त

विश्वभूषण लिमये
मंगळवार, 25 मे 2021

घाटणे ग्रामपंचायतीचा एक सेवक म्हणून तुमच्या सहकार्याची मला गरज आहे. तुमच्या निरोगी आयुष्यासाठी ही तळमळ आहे.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील घाटणे येथे मार्च महिन्यापर्यंत एकही कोरोना रुग्ण (COVID-19) आढळून आला नव्हता. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गावात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला अन्‌ तेथून दररोज कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करून गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामस्थांना एकत्र करत "बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह' ही मोहीम गावातील सरपंच ऋतुराज देशमुख (Sarpanch Ruturaj Deshmukh) यांनी हाती घेतली. याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि बघता बघता गावात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली अन्‌ आज गाव कोरोनामुक्त झाले आहे.

घाटणे ग्रामपंचायतीचा एक सेवक म्हणून तुमच्या सहकार्याची मला गरज आहे. तुमच्या निरोगी आयुष्यासाठी ही तळमळ आहे. आपले पूर्ण सहकार्य देऊन गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन देशमुख यांनी ग्रामस्थांना केले. या आवाहनाला ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद आणि गाव कोरोनामुक्त करण्यासाठी रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीच्या आधारावर आपण गाव कोरोनामुक्त करू  असा विश्वास ग्रामस्थांना या तरुण सरपंचाने दिला आणि तो सार्थ ही करून दाखवला.

 "बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह' ही मोहीम राबवली
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सर्वांत तरुण सरपंच म्हणून ऋतुराज देशमुख यांची घाटणेच्या सरपंचपदी निवड झाली आहे. सरपंचपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर ऋतुराज देशमूख यांनी गावाच्या विकासासाठी अनेक मोहिमा हाती घेतल्या असून, यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी जमा करण्याचे काम त्यांनी हाती घेतले. मात्र, यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने काही प्रमाणात अडथळा आणला आहे. मार्चपर्यंत घाटणेमध्ये एकही कोरोनाबाधित नव्हता. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. कोरोनाची ही लाट थोपवून गावाला कोरोनामुक्त करण्यासाठी ऋतुराज यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्र केले आणि सुरू झाली एक आगळीवेगळी "बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह' ही मोहीम. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आज घाटणे गाव कोरोनामुक्त झाला आहे. 

बारामतीत शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले टोमॅटो... (पहा व्हिडीओ)

मोहिमेतील उपाययोजना
गावातील जी मंडळी शहरात जातात किंवा लोकांच्या संपर्कातील विविध व्यवसायात असतात, त्यांच्या आवश्‍यकतेनुसार रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या.  गावातील 45 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेतले. गावात घरोघरी जाऊन आशा ताईंच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला गावकऱ्यांची तपासणी केली जात असून त्यात त्यांची ऑक्‍सिजन लेव्हल, तापमान चेक केले जाते.  प्रत्येक कुटुंबाला एक "कोरोना सेफ्टी किट' दिले असून त्यात व्हिटॅमिन गोळ्या, सॅनिटायझर, मास्क, साबण उपलब्ध करून दिले.  बाहेर गावातून राहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना सक्तीने तीन दिवस क्वारंटाइन करून या माध्यमातून कोरोनाची चेन ब्रेक करण्याचा प्रयत्न केला. सगळ्या मोहिमेत गरजेनुसार गावासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष किंवा मिनी कोव्हिड सेंटर, जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून सुरू करण्याचा विचार केला. 

डोंबिवलीत 'या' कारणावरून सेना भाजपमध्ये तापले राजकारण

 गाव कोरोनामुक्त करण्यासाठी रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीच्या आधारावर गाव कोरोनामुक्त केले.  दरम्यान,गावात कोरोनाने दोन मृत्यू झाल्यानंतर लोकं वाड्या- वस्त्यांवर राहण्यासाठी जाऊ लागले. इतके भीतीचे वातावरण कोरोनामुळे गावकऱ्यांमध्ये निर्माण झाले होते. मात्र, ग्रामपंचायतीने प्रभावी उपाययोजना केल्यानंतर पुन्हा एकदा वाड्या- वस्त्यांवर राहण्यासाठी गेलेले ग्रामस्थ गावात राहण्यासाठी येत आहेत. 

Edited By : Pravin Dhamale

 


संबंधित बातम्या

Saam TV Live