का आले गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात पाणी? पहा आज 'साम टिव्ही'

Pramod Sawant Banner
Pramod Sawant Banner

र्यटनाची भूमी असलेल्या गोव्याची बहुतांश मदार ही आयातीवर होती. मात्र, माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकरांनी पाहिलेली दूरगामी विकासाची स्वप्न सत्यात उतरवत गोवा आता आयातीवर अवलंबून न राहता निर्यातीचं महत्त्वाचं केंद्र बनला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जगावर कोरोनाचं संकट आलेलं असताना, त्यातही स्वयंपूर्ण होण्याची मुहूर्तमेढ गोव्यात रोवली आणि संकटात स्वयंपूर्णतेचा आदर्श पल्ला गोव्यानं गाठलाय. कोरोनाच्या संकटात संपूर्ण देशासाठी आदर्श ठरणाऱ्या उपाययोजना गोव्यात राबवल्या गेल्या. इतकंच नाही तर, संकटाच्या काळात स्वत: हातात इंजेक्शन आणि गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून रुग्णांची सेवा करतानाचे अनुभव सांगताना डॉ. प्रमोद सावंत यांच्या डोळ्यांतून मानवता पाझरत होती. (Goa CM Exclusive interview by Rajendra Hunje Tomorrow)

कोरोनाचा (Cororna) राक्षस सर्वत्र थैमान घालत असताना, गोव्यात (Goa) लॉकडाऊनसह अनेक उपाययोजना अत्यंत सचोटीने राबवल्या गेल्या, मात्र, लॉकडाऊनमध्ये अर्थचक्र रुतून पडू नये म्हणून कृषीसह अन्य उद्योगही काळजी घेत राबवण्यात आले. त्याचसोबत, गोव्यात सुमारे ४ लाखांपर्यंतचे उपचार मोफत करण्यात आले. शासकीय आणि खासगी रुग्णालयांतही रुग्णांना मोफत उपचार करण्यात आले. सोबतच, शासन-प्रशासन आणि अनुशासन या त्रिसूत्रीने गोवा 'शून्य कोरोना रूग्ण' हा टप्पा पार करू शकला. त्यामुळेच, कोरोनावर मात करत देशात पहिल्यांदा अनलॉकचा नारा देणारं राज्य म्हणून गोव्याचा सन्मानही झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी अभिमानाने सांगितलंय.

महाराष्ट्रात (Maharashtra) चाललेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लवकरच काहीतरी चांगलं घडणार असल्याचे संकेत गोव्याचे धडाकेबाज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. 

'साम टीव्ही'ला (Saam TV) दिलेल्या खास मुलाखतीत डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या प्रगतीचा, गोव्यात राबवलेल्या अनेक यशस्वी उपक्रमांचा सांगोपांग आढावा तर मांडलाच, पण त्याचसोबत, गोव्याच्या सर्वांगीन विकासासाठी टार्गेटेड प्रोग्रामचा आराखडाही मांडला.

आपल्याला मंत्रिपदाचा कसलाही अनुभव नसताना, थेट मुख्यमंत्रिपदाची धुरा समर्थपणे पेलू शकलो आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहिलो. दिवंगत मनोहर पर्रिकरांनी दाखवलेला विश्वास, त्यांनी दिलेले आशीर्वाद आणि त्यांचे संस्कार यामुळेच हे शक्य झालं असून मोदी, शहांसह भाजपचे केंद्रीय नेते आणि गोव्यातील भाजप नेते यांनीही मोलाची साथ दिल्याचं डॉ. सावंतांनी कृतज्ञपणे सांगितलंय. 'ये लंबी रेस का घोडा है' असं पर्रिकरांनी म्हटल्याची आठवण 'साम टीव्ही'च्या मुलाखतीत सांगताना मुख्यमंत्र्यांचा कंठ दाटून आला होता.

संपूर्ण जगासाठी पर्यटनभूमी असलेला गोवा कर्मभूमी आहेच, पण बरचसं शिक्षण कोल्हापुरात झालं असल्याने महाराष्ट्राशीही आपली नाळ जोडल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलंय. तसेच, मोठ्या प्रमाणात सामूहिक गोशाळा उभारत गोव्याने धवलक्रांती साधली असून, आता गोशाळेत दुधासोबतच विजेची निर्मितीही होत असल्याचं डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितलंय. (Goa CM Exclusive interview by Rajendra Hunje Tomorrow)

पर्यटनासाठी गोव्यात येणारे पर्यटक गोव्याने पाहिलेत. पण, शिक्षणासाठी परदेशी विद्यार्थी गोव्यात पुढच्या काळात येतील असा आशावाद व्यक्त करत, गोव्यात नारीशक्तीच्या हातांना बळ देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्याचसोबत, मुख्यत: पर्यटनावर अर्थकारण अवंलबून असलेल्या गोव्यात आता कृषी, उद्योग आणि शिक्षणाचीही महाद्वारं खुली होणार आहेत. खाणी सुरू करून राज्याच्या आर्थिक तिजोरीत मोठी भर पडणार असल्याचा आशावाद आणि निर्धार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'साम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची 'साम टीव्ही'चे डेप्युटी एडिटर राजेंद्र हुंजे यांनी घेतलेली ही संपूर्ण सविस्तर मुलाखत आज (शनिवारी) संध्याकाळी ६ आणि रात्री ९ वाजता 'साम टीव्ही'वर पाहता येणार आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com