आम्हीही माणसे आहोत आमच्या कुटुंबापर्यंत येऊ नका- अजित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 29 सप्टेंबर 2019

 आम्हीही माणसे आहोत आमच्या कुटुंबापर्यंत येऊ नका- अजित पवार 

 आम्हीही माणसे आहोत आमच्या कुटुंबापर्यंत येऊ नका- अजित पवार 

'माझ्या राजीनाम्यानंतर पवार कुटुंबामध्ये गृहकलह असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आमच्या कुटुंबात नेहमी ज्येष्ठ व्यक्तीच निर्णय घेते. शरद पवार हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्या शब्दाबाहेर मी कधीच जाणार नाही. सुप्रिया राजकारणात आली तेव्हा, पार्थच्या निवडणुकीदरम्यान आणि त्यानंतर आता रोहितच्या नावाने या बातम्या सतत जाणीवपूर्वक दिल्या जातात. मात्र आम्हीही माणसे आहोत आमच्या कुटुंबापर्यंत येऊ नका', अशी विनंती त्यांनी यावेळी केली. हे सर्व बोलत असताना अजित पवार भावनाविवश झाले व त्यांना हुंदका आवरला नाही. 'निवडणुका आल्यावरच या घटना त्यांना का आठवतात', असा सवालही त्यांनी केला.

अजित पवार यांनी शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली व त्यानंतर ते पत्रकार परिषदेला सामोरे गेले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आदी नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी अजित पवार म्हणाले, 'आमदारकीचा राजीनामा देताना पक्षातील सहकारी जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड किंवा अन्य कुणाशीही मी चर्चा केली नव्हती. कारण चर्चा केली असती, तर यातील प्रत्येकाने आपल्याला असे करू नका, असाच सल्ला दिला असता. ही माझी कृती चूक की बरोबर यात मी जात नाही. मात्र यामुळे पक्षातील माझे सहकारी, कार्यकर्ते यांना जो त्रास झाला, त्याबद्दल मी माफी मागतो.'

आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन बारामती मतदारसंघातूनच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करतानाच, 'येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार जो आदेश देतील, तो पूर्णपणे पाळण्याचा शब्द आपण साहेबांना दिला आहे', असे स्पष्ट केले.

'शिखर बँकेचे प्रकरण सन २०११चे आहे. यात राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणे बाकी असताना त्यापूर्वीच ईडीही त्यात आली. पीएमसी बँकेच्या संचालक मंडळांवर कोण लोक आहेत, याचाही पत्रकारांनी शोध घ्यायला हवा', असेही ते म्हणाले. यावेळी जयंत पाटील व धनंजय मुंडे यांनी, 'पक्षाला जाणीवपूर्वक अशा खोट्या बातम्यांमधून बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र आहे. त्याच्या विरोधात कशा प्रकारे लढायचे याबाबत आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत', असे स्पष्ट केले.

Web Title :: We too are men. Don't come to our family - Ajit Pawar


  


संबंधित बातम्या

Saam TV Live