संकटग्रस्तांना मदत न करणाऱ्यांच्या आरत्या ओवाळायच्या का? - शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

 

 

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी मंगळवारी काढण्यात आलेल्या रॅलीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कार्यकर्त्यांनी फुलांची अशी उधळण केली.
सोलापूर - पवार कधीही तुरुंगात गेले नाहीत. तुरुंगात गेलेल्यांना आम्हाला काहीही सांगायचे नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोण काय म्हणतेय याची चिंता करू नये. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथील मेळाव्यात बोलताना कार्यकर्त्यांना दिला. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी राज्यात शरद पवारांनी काय केले, असा सवाल उपस्थित केला होता, त्याला आज पवार यांनी उत्तर दिले.

पवार म्हणाले, ‘‘सांगली-कोल्हापूर-गडचिरोली या ठिकाणी पावसाने हाहाकार माजविला आहे. पण मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत मश्‍गूल आहेत.

संकटग्रस्तांना मदत न करणाऱ्यांच्या आरत्या ओवाळायच्या का? त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करून राज्याची गाडी पुन्हा रुळावर आणण्याचे काम आपणाला करायचे आहे.. मी काय म्हातारा झालो नाही. मला अनेक जणांना घरी पाठवायचे आहे. ते म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या तरुणाईच्या ताकदीच्या जोरावर. हा पहिला टप्पा आहे. मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता तुमचे तुम्ही बघा. मी घरी येणार नाही. आता मला काही लोकांकडे बघायचे आहे.’’

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी राज्य दौऱ्याची सुरवात सोलापुरातून केली. आपल्याला विधानसभेची निवडणूक शंभर टक्के जिंकायची आहे. त्यामुळे पवार यांनी कार्यकर्त्यांना हात वर करून विजयाची शपथ दिली.

पवार म्हणाले, की गेलेल्यांचा विचार करायला नको. येणाऱ्यांचा विचार करा. मावळणाऱ्यांची चर्चा पुन्हा करू नका. नव्याने उभे राहणाऱ्याचे दर्शन घ्यायला शिका. राज्यात अनेकांनी सुभेदारी मिळत असल्यामुळे बदलण्याची भूमिका घेतली आहे. ते लाचार झाले आहेत. पण राज्यातील जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्‍चित होईल.

Web Title: Why shave off those who are not helping those in distress? - Sharad Pawar


  


संबंधित बातम्या

Saam TV Live