आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांचे पगार कपात होणार? वाचा काय आहे नवीन नियम?

साम टीव्ही
शनिवार, 23 जानेवारी 2021
  • आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यास दणका
  • कर्मचाऱ्याच्या पगारातून 30 टक्के पगार होणार कपात
  • औरंगाबाद जिल्हा परिषदेचा महत्त्वपूर्ण निर्णय

आई-वडिलांचा सांभाळ करत नसलेल्या मुलांसाठी ही बातमी आहे. जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडाल तर तुमचा पगार कपात होणार आहे. होय, हे खरं आहे. असा निर्णय घेण्यात आलाय. कुणी घेतलाय हा निर्णय? कोण करणार आहे पगार कपात तुम्हीच वाचा...

आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्यास नकार देणाऱ्या मुलाला अद्दल घडवण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेनं चांगलाच निर्णय घेतलाय. चांगला पगार असूनही आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार 30 टक्के कपात केला जाणाराय. ही रक्कम थेट संबंधित कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांच्या खात्यात जमा होणाराय. हा महत्त्वपूर्ण ठराव औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलाय. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके यांनी हा ठराव मांडला. त्यानंतर जिल्हा भरातील सर्वच सदस्यांनी समर्थन दिलंय.

मुलगा मोठ्या पदावर कार्यरत असतानादेखील जन्मदात्यांना त्यांच्याच घरात मान-सन्मान मिळत नाही. त्यांची अवहेलना होते, अशा लेखी तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या होत्या. काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना तोंडी सांगूनही ऐकत नसल्यानं अखेर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव ठेवण्यात आला. या निर्णयाचं जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनीही स्वागत केलंय.

आई-वडिलांना सांभाळण्याचा मुद्दा पोटतिकडीने सभागृहात मांडला. या भावनिक मुद्द्यांवर सगळे एक झाले. मात्र, केवळ निर्णय घेऊन चालणार नाही तर त्याची अंमलबजावणी केली गेली तर खऱ्या अर्थाने आईवडिलांचा सन्मान होईल.


संबंधित बातम्या

Saam TV Live