आता झोमॅटो देणार घरपोच दारू? दारू घरपोच देण्यासाठी झोमॅटोनं कंबर कसली 

साम टीव्ही
गुरुवार, 7 मे 2020
  • दारू घरपोच देण्यासाठी झोमॅटोनं कंबर कसली 
  • घरपोच दारू पोहचवण्याची परवानगी द्या
  • झोमॅटोची मागणी मान्य होणार ?

मुंबई : लॉकडाऊनमध्ये दारूच्या दुकानांना थोडीशी सूट मिळाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झालीय. अशातच आता दारू घरपोच देण्यासाठी झोमॅटोनं बाह्या सरसावल्यात. काय आहे झोमॅटोचा प्रस्ताव, पाहा...

लॉकडाऊनमध्ये दारूविक्रीची दुकानं सुरू झाल्यानंतर तळीरामांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. पण या दारूसाठी त्यांनी प्रचंड कष्टही घ्यावे लागतायेत. हीच संधी साधत झोमॅटोनं आता घरपोच दारू पोहचवण्याचा प्रस्ताव ठेवलाय. इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशन ऑफ इंडियाकडे झोमॅटोनं ही मागणी केलीय.

लॉकडाऊनमुळे फूड डिलिव्हरी बंद झालीय. त्यामुळे झोमॅटोला मोठं नुकसान सोसावं लागतंय. जेवण नाही तर नाही किमान दारू तरी घरपोच देण्याची परवानगी द्या अशी मागणी आता झोमॅटोनं केलीय. 

तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये बऱ्याच ठिकाणी दारूच्या दुकानांना सवलत देण्यात आलीय. मात्र दारू घेण्यासाठी तळीराम झुंबड करतायेत. उन्हा तान्हात लोक रांगेत उभे असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सध्याच्या घडीला दारू घरपोच देण्याच्या मनस्थितीत सरकार नाही. मात्र झोमॅटोकडून परवानगीसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे.

तळीरामांनी झोमॅटोच्या भूमिकेचं स्वागत केलंय. तर काही सामाजिक संघटनांचा मात्र याला विरोध आहे. आता सरकार यावर नेमकी काय भूमिका घेतं यावरच तळीरामांचं पुढील भवितव्य अवलंबून असेल 


संबंधित बातम्या

Saam TV Live