दारु दुकानावर हल्लाबोल; महिला आक्रमक

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 जानेवारी 2019

औरंगाबाद - शहरातील विजयनगर येथील तरुणाच्या मृत्यूनंतर स्थानिकांच्या संयमाचा बांध फुटला. महिलांसह स्थानिकांनी देशी दारू दुकानावर हल्लाबोल करून तोडफोड केली. यानंतर रस्त्यावर दारू बाटल्या फेकून आग लावत त्यांनी देशी दुकान बंद केले. हा प्रकार सोमवारी (ता. सात) सायंकाळी सव्वापाचनंतर घडला. 

औरंगाबाद - शहरातील विजयनगर येथील तरुणाच्या मृत्यूनंतर स्थानिकांच्या संयमाचा बांध फुटला. महिलांसह स्थानिकांनी देशी दारू दुकानावर हल्लाबोल करून तोडफोड केली. यानंतर रस्त्यावर दारू बाटल्या फेकून आग लावत त्यांनी देशी दुकान बंद केले. हा प्रकार सोमवारी (ता. सात) सायंकाळी सव्वापाचनंतर घडला. 

विजयनगरच्या भरचौकात असलेल्या देशी दारू दुकानामुळे मद्यपींचा स्थानिकांना त्रास सुरू होता. मद्यपींकडून छेडछाड, असभ्य वर्तनाचे प्रकारही घडले होते. याविरोधात स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवदेनही दिले होते; परंतु त्या वेळी निवदेनाची दखल घेण्यात आली नाही. दरम्यान, विजयनगर चौक परिसरातील एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याला मद्याचे व्यसन होते.

मद्यसेवनामुळे त्याचा मृत्यू झाला. ही बाब असह्य झाल्याने स्थानिक महिलांचा संयम सुटला. यानंतर मोठ्या प्रमाणात महिलांसह नागरिक सायंकाळी एकत्र जमले. सुमारे दीडशेच्या जमावाने चौकातील सर्व रस्ते बंद केले. त्यानंतर देशी दारू दुकानावर हल्लाबोल केला. आत वीस ते पंचवीस जणांनी घुसून दुकानाची तोडफोड केली. दुकानची नासधूस केल्यानंतर संतप्त जमावाने दारूच्या बाटल्या, बॉक्‍स रस्त्यावर आणून फेकले. त्याचाही रस्त्यावरच चुराडा करून त्याला आग लावण्यात आली. या घटनेनंतर पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविले.

आंदोलनात औरंगाबाद महिला काँग्रेस समितीच्या अध्यक्षा सरोज मसलगे पाटील, शहर सचिव मीरा प्रधान, जिल्हा काँग्रेस समितीचे सरचिटणिस श्रीकांत तौर पाटील, विमल अवसरमोल, सपना अवसरमोल, कल्पना दंवडे, सुनंदा खरात, जयश्री खाडे, सुनील त्रिभुवन, सचिन कापसे, आकाश मिसाळ, अविनाश आटोळे, भगवान वाघमारे, बाबासाहेब दाभाडे, बाबासाहेब साळवे, कैलास सोनवणे, राजू सावळे यांचा सहभाग होता. 

पुंडलिकनगर पोलिसांना निवेदन
घटनेनंतर स्थानिकांनी पुंडलिकनगर ठाण्यात उपस्थित सहायक आयुक्तांना निवदेन दिले. पोलिस आयुक्तांच्या अधिकारात एक महिन्यासाठी देशी दारू दुकान बंद करण्यासाठी पावले उचलू, असे आश्‍वासन सहायक आयुक्तांनी दिल्याची माहिती योगेश मसलगे पाटील यांनी दिली.

नागरिक होते त्रस्त
विजयनगर अत्यंत गजबजलेला भाग असून, येथे शाळाही आहे. चौकातही मोठी वर्दळ असल्याने या भागात मुली, महिलांची वर्दळ असते. त्यांच्याशी छेडछाड होत असून, यामुळे नागरिकही त्रासले होते. आंदोलनकर्त्या पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली; तसेच चौकात पोलिसांचा बराच वेळ पहारा होता.

Web Title: Woman Attack on Wine Shop Crime


संबंधित बातम्या

Saam TV Live