#WomensDay बस, रुग्णवाहिकाही नाही तिथे पोहोचतात 'स्कुटी'वाल्या मनिषा महाले!

#WomensDay बस, रुग्णवाहिकाही नाही तिथे पोहोचतात 'स्कुटी'वाल्या मनिषा महाले!

नाशिक- सुरगाणा- तिथे बस पोहोचत नाही. रुग्णवाहिका जात नाही. पावसाळ्यात तर रस्ताही ओलांडता येत नाही. त्याचे नाव कोडीपाडा. सुरगाणा पंचायत समितीच्या सभापती मनिषा महाले या गावी राहतात. स्कुटी घेऊन फिरतात. महिलांना एकत्र करीत व्यवहार शिकवतात. त्यांचे प्रश्‍न सोडवत अडचणींशी लढतात. गुजारतच्या सीमेवरच्या या परिसरात त्यांची ही लढाई परिसरातील महिलांना धीर देणारी, समस्येचे उत्तर सांगणारी वाटते. या दुर्गम भागात स्कुटीवरुन महाले दिसल्या की महिला त्यांची वाट अडवून समस्या सांगतात अन्‌ सौ. महाले त्याचे निराकरण करतात.

महाराष्ट्रात गुजरातच्या सीमेवरील हे पाडे दुर्गम आणि प्रतिकुल भौगोलीक स्थिती असलेले आहेत. सरकारने ठरवले तरी यातील अनेक समस्या दूर होत नाही. पावसाळ्यात तर येथे वीजेचे खांब असतात, मात्र वीज नसते. रस्ता दिसतो मात्र नार, पार या दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्यामुळे जाता येत नाही. अगदी आजारीपण आले तरी पाणी ओसरल्याशिवाय दवाखान्यात जाता येत नाही. 

या भागातील भवाडा गणातून मनिषा महाले मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पंचायत समिती सदस्या म्‌हणून विजयी झाल्या. दोन महिन्यांपूर्वी त्या सभापती झाल्या. आता त्या गावोगावी महिलांना संघटीत करुन बचत गट स्थापन करीत आहेत. या महिलांचे सबलीकरण करीत आहेत. दिसेल तिथे बैठक घेतात. प्रश्‍न ऐकतात अन्‌ ते सोडविण्यासाठी शुक्रवारी व सोमवारी दिवसभर सुरगाण्याला पंचायत समितीच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत त्याचे निराकरण करतात. इथे बस येत नाही. रुग्णवाहिका पोहोचत नाही. वाहतुकीची सोय नाही. मात्र स्कुटीवाल्या महाले ताई प्रत्येक पाड्यावर जातात. दररोज दिसतात. त्यामुळे स्कुटी दिसली की महिला त्यांना अडवून समस्या सांगू लागतात. यातून त्यांच्यात विश्‍वासाचे एक नाते तयार झाले आहे.

भवाडा गणातील अतीदुर्गम भागातील मनिषा महाले यांच्या गळ्यात माकपच्या रुपाने सभापती पदाची माळ पडली आहे. गहाले या भागात महिला बचत गट, महिला जनवादी संघटना यांच्या माध्यमातून सतत संपर्क ठेवतात. त्यांनी तरुणांना, महिलांना संघटित करून अनेक वेळा रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. या पाड्यांच्या आरोग्य, पाणी, शिक्षण हे प्रश्न सोडविले आहेत, तालुक्‍यातील गरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या प्रश्नांवर आवाज उठवून संघर्ष केला आहे. आमदार जे. पी. गावितांच्या संपर्कात आल्यावर त्या कम्युनिस्टांच्या राजकीय प्रवाहात सामी झाल्या. माजी आमदार गावीत मार्गदर्शनाखाली महिलांना सबळ करण्यासाठी त्या सक्रीय आहेत. जनतेशी अन्‌ पक्षाशी एकनिष्ठ राहत त्या संघटन वाढवीत आहेत. किसानसभा, एस.एफ.आय., डी. वाय, एफ. आय. जनवादी महिला संघटनेत त्या सक्रिय होऊन पक्षाला बळ देत आहेत.

त्यांच्या या संपर्क आणि कामामुळेच आदिवासींच्या सुख दुःखात सहभागी होत असल्याने पक्षाच्या कार्यकर्ते, युवकांनी आणि नागरीकांनी त्यांच्या नावाला पसंती दिली. आगामी काळात सभापतीपदाचा उपयोग तालुक्‍यातील तरुण, आदिवासींच्या प्रश्नांसाठी करणार आहे. लोकांनाही त्यांच्याविषयी अपेक्षा आहेत. या निमित्ताने त्यांना या दुर्गम भागातील पिण्याचे पाणी, वीज,रस्ते, शिक्षण,आरोग्य या समस्यांच्या निराकरणाची संधी मिळाली आहे. त्यासाठी स्कुटीवरुन आपला परिसर पिंजुन काढतात.

WEB TITLE- #WomensDay Ideal for women

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com