या पुढे पुण्यात उंच देखाव्यांची यंदाची शेवटची मिरवणूक?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

पुणे : भव्य देखावे, आकर्षक रथ आणि रंगीबेरंगी विद्युतरोषणाई अशा वैविध्याने नटलेली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या उत्साहाने येतात. पुढील वर्षीपासून मात्र भव्य व उंच देखावे सादर केलेल्या मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून टिळक चौकातून पुढे संभाजी पुलावरून खंडुजीबाबा चौकाकडे मार्गस्थ होण्यात अडचण येणार असल्याने, अनेक मंडळांची उंच देखाव्यांची यंदाची शेवटची मिरवणूक ठरण्याची शक्‍यता आहे. 

पुणे : भव्य देखावे, आकर्षक रथ आणि रंगीबेरंगी विद्युतरोषणाई अशा वैविध्याने नटलेली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या उत्साहाने येतात. पुढील वर्षीपासून मात्र भव्य व उंच देखावे सादर केलेल्या मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून टिळक चौकातून पुढे संभाजी पुलावरून खंडुजीबाबा चौकाकडे मार्गस्थ होण्यात अडचण येणार असल्याने, अनेक मंडळांची उंच देखाव्यांची यंदाची शेवटची मिरवणूक ठरण्याची शक्‍यता आहे. 

महामेट्रोच्या वतीने मेट्रो उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. पौड रस्त्यावरील आनंदनगर येथून कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय येथील काम प्राधान्याने करण्यात येत आहे. त्यानंतर महाविद्यालयातून मुठा नदीपात्रातून मेट्रो मार्गस्थ होईल. नदीपात्रातील खांबांची उभारणी बऱ्याच प्रमाणात पूर्ण झाली आहे. त्यावरील व्हायाडक्‍टचे काम पुढील वर्षात केले जाईल. संभाजी पुलावर या व्हायाडक्‍टची उंची पुलापासून साडेपाच मीटर इतकी असेल. त्यामुळे, 18 ते 20 फुटांपेक्षा जास्त उंचीचे देखावे या पुलावरून पलिकडे खंडुजीबाबा चौकाकडे जाऊ शकणार नाहीत. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टच्या यंदाच्या विसर्जन मिरवणुकीतील श्री विकटविनायक रथाची उंची 21 फूट आहे. मंडई गणेशोत्सव मंडळ, बाबू गेनू तरुण मंडळ यांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील देखाव्यांची उंची सर्वसाधारणपणे 26 ते 28 फूट असते. यांसारख्या भव्य देखावे सादर करणाऱ्या मंडळांच्या रथाची अथवा मिरवणुकीतील देखाव्यांची उंचीही वीस फुटांपेक्षा अधिक असते, अशी माहिती शिल्पकार विवेक खटावकर यांनी दिली. ते मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत. 

खटावकर म्हणाले, "तुळशीबाग मंडळाची गणेश मुर्ती 15 फूट उंच आहे. दोन फुट उंचीचा चौथरा आणि चार फूट उंचीची ट्रॉली लक्षात घेता त्याची उंची 21 फूट होते. सजावटीलाही जागा मिळणार नाही.'' 

महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम म्हणाले, "व्हायाडक्‍टची उंची जमिनीपासून साडेपाच मीटर असते. म्हणजे साडेअठरा फूट जागा उपलब्ध होईल. पुलापाशी 18 ते 20 फुट जागा उपलब्ध होऊ शकते.'' 

लक्ष्मी रस्त्यावरून येणाऱ्या जास्त उंचीच्या देखाव्यांना टिळक चौकानंतर अन्य मार्गांना वळावे लागेल. टिळक चौकात केळकर रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि कुमठेकर रस्ता या तिन्ही मार्गांनी मिरवणूक येते. टिळक रस्त्याने आलेली मिरवणूक शास्त्री रस्त्याकडे वळते. त्यामुळे मोठे देखावे सादर करणाऱ्या मंडळांना शास्त्री रस्त्याकडे वळावे लागेल, अथवा त्यांच्यासाठी टिळक चौकातून स्वतंत्र मार्ग काढावा लागेल. हे लक्षात घेतल्यास, अनेक मंडळे देखाव्यांची उंची पुढील वर्षी अठरा फुटांपर्यंत कमी करण्याची शक्‍यता आहे.

Web Title: This years last meet of high looks Ganpati immersion procession in Pune


संबंधित बातम्या

Saam TV Live