तुम्ही मतदान कुणालाही करा! पण त्याआधी या गोष्टींचा विचार  आपण करणार आहोत का?

आशीष सुर्यवंशी, सिद्धेश सावंत
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

मतदान आपला अधिकार आहे. आपण सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे. पण मतदान करताना आपण कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी विचारत घेणं टाळलं पाहिजे, याचे संस्कार आमच्यावर कधीच झाले नाहीत. कशाचा विचार करावा आणि कशाचा करु नये, कुणीच शिकवलं नाही. अशावेळी मी डोकं खाजवत बसलो होतो, की नेमकं मतदान देण्याआधी काय केलं पाहिजे? त्यातूनच आलेला हा लेखप्रपंच...

मतदान आपला अधिकार आहे. आपण सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे. पण मतदान करताना आपण कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी विचारत घेणं टाळलं पाहिजे, याचे संस्कार आमच्यावर कधीच झाले नाहीत. कशाचा विचार करावा आणि कशाचा करु नये, कुणीच शिकवलं नाही. अशावेळी मी डोकं खाजवत बसलो होतो, की नेमकं मतदान देण्याआधी काय केलं पाहिजे? त्यातूनच आलेला हा लेखप्रपंच...

मतदानाचा हक्क आपण बजावूच. एक जबाबदार नागरिक म्हणून मतदान करण्याचा हक्क बजावताना पुढची 5 वर्ष अधिकारवाणीनं बोलण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर सगळ्यात आधी आपला विवेक जागृत ठेवला पाहिजे. कुणाला मत द्यायचं?, हा प्रत्येकाने घ्यायचा स्वतंत्र निर्णय आहे. पण आपण सद्सद्विवेक बुद्धीने मतदान करण्यासाठी कशाचा विचार केला पाहिजे, याचा घेतलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे. एक व्यक्ती, नागरीक आणि मतदार म्हणून आपण मतदान करण्याआधी मागच्या 5 वर्षात काय काय झालं, याचा एकदा फ्लॅशबॅक घ्यायलाच हवाय.

चला तर मतदान करायला निघालेलोच आहोत, तर दोन मिनिटांसाठी मागच्या पाच वर्षांचा फ्लॅशबँकही घेवून टाकू...  हे सोप्प व्हावं, यासाठी कॅसेट रिव्हाईंड करु...

मागच्या ५ वर्षात या सगळ्या गोष्टी घडल्यात.. तुम्हाला आठवतंय का? ते पाहा...

आरेतील झाडं तोडली गेली - 

४ ऑक्टोबरला वृक्षतोडीचा कोर्टाचा निर्णय आला. एका रात्रीत २७०० झाडांची कत्तल झाली. सत्ताधाऱ्यांनी वृक्षतोडीचं समर्थन केलं. शिवसेनेनं वृक्षप्राधिकरणात विरोध, आणि सत्तेत असून फक्त बोलका विरोध दाखवला. राष्ट्रवादीनं मनपात वृक्षतोडीला पाठिंबा दिला. आरेतील झाडं वाचवण्यासाठी सर्वसामान्यांनी आंदोलनं केली. 

पण सरकारने काय केलं? विरोधकांनी काय केलं? सामाजिक संस्थांनी काय केलं? आणि एक मतदार म्हणून आपण या सगळ्याकडे कसं पाहणार आहोत? आपण याचा विचार करणार आहोत ना?

पीएमसी बँकेवर निर्बंध आले, लोकांचे पैसे अडकले -

पीएमसी बँक अडचणीत आली. खातेधारकांची कोंडी झाली. फक्त मर्यादित रक्कमच काढण्याची मुभा मिळाली. पाच लोकांनी या धास्तीनं जीव गमावला. हजारो खातेधारकांचे लाखो रुपये अजूनही बँकेत बंद आहेत. आपण याचा विचार करणार आहोत का मत देताना?

 

कांदा ६० रुपये किलो झाला - 

कांद्यावर निर्यातबंदी लावली गेली. कांद्याचे घाऊक भाव पुन्हा पडले. पण ग्राहकांना मिळणारा कांदा स्वस्त झाला का? शेतकऱ्याच्या हाताला पैसा नाही. पाकिस्तानातून कांदा खरेदी करण्याचा सरकारनं निर्णय घेतला. विरोधकांनी सरकारवर टीका केली. कांद्यासाठी कुठलंही आंदोलन झालं नाही. माझ्याकडे कांदा घेण्यासाठी खूप पैसे आलेले असावेत, कदाचित. पण सगळ्यांकडे ६० रुपये किलोने कांदा घेण्याइतके पैसे असतील का? याचा विचार मी मत देताना केला पाहिजे का?

जगणं महाग झालं, असेल पण मृत्यू तर स्वस्त झाला ना? - 

गेल्या ५ वर्षात १४ हजार शेतकऱ्यांचा आत्महत्या झाल्याची आकडेवारी समोर येतेय. मुंबईत लोकलमध्ये पडून हजारो लोकांनी जीव गमावले. ही आकडेवारीही काळीज सुन्न करणारी आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्यात कोणाचं अपयश?

लोकलच्या गर्दीवर तोडगा निघाला का? तिकिटं रेल्वेचं महागलं नाही, पण प्रवासाचा दर्जा सुधारला का? मत देताना याचा विचार केला पाहिजे का?

माझी नोकरी सुरु आहे, पण त्या कर्मचाऱ्यांचं काय? - 

 

बीपीसीएल, बीएसएनएल-एमटीएनएलचे कर्मचारी रस्त्यावर आले. कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले. तिन्ही कंपन्यांच्या खासगीकरणाच्या बातम्या समोर येत आहेत.  एसटी कर्मचाऱ्यांना पगारासाठी संप करावा लागला. बेस्ट बसच्या कर्मचाऱ्यांचंही तेच. डॉक्टरांच्या संपाचाही फटका रुग्णांना बसला. यातल्या एकातरी संपामुळे माझ्या जगण्यावर काय परिणाम झाला? याचा विचार होणं गरजेचंय का?

गेल्या वर्षी बळीराजा संपावर गेला - 

इतिहासात पहिल्यांदाच मागील वर्षी बळीराजा संपावर गेला.मुंबईला होणारा दूध भाजीपाल्याचा पुरवठा थांबला. शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईवर आला. त्यावेळी सरकारनं आश्वासन देऊन मोर्चा शांत केला. विरोधकांनी मोर्चा मुंबईत आल्यावर त्याला पाठिंबा दिला. पण मागण्यांबाबत कुणी पाठपुरावा केला का? मुंबईवर भविष्यातही पुन्हा मोर्चा येऊ शकतो? 

 

कसलेली जमिनी मिळावण्यासाठी आदिवासींचा मोर्चा - 

तुम्हाला ते शेतकऱ्यांचे पाय फाटलेले फोटो आठवत आहेत का? रणरणत्या उन्हात चालून पोळलेले शेतकऱ्यांचे ते पाय जर आपण विसरुन गेलो तर आपल्यातली संवेदनशीलताच मेली आहे, हे सिद्ध होईन जाईल.  नाशिकहून आदीवासी शेतकरी मुंबईपर्यंत चालत आले. सरकारनं मोर्चेकऱ्यांशी बातचित केली. आणि या मोर्चेकऱ्यांनी माघार घेतली. विरोधी पक्ष आंदोलनात दिसले. पुढे त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी मिळाल्याचं तुम्ही कुठे ऐकलं का? वाचलं का? आपण मत देताना या आदिवासी शेतकऱ्यांचा विचार नाही करायचा तर कुणाचा करायचा?

पश्चिम महाराष्ट्राला पुरानं झोडपलं - 

पश्चिम महाराष्ट्रात खूप पाऊस झाला. अलमट्टी धरणामुळे हा पूर आल्याचं कळतं. पण पूर आल्यानंतर ही मदत पोहोचायला इतका वेळ का लागला? पुरादरम्यान बचावकार्य करणारी बोट   सांगलीत बुडाली. तिथे लेकराला उराशी धरुन असलेल्या एका आईचा जीव गेल्याचा फोटो तुम्ही पाहिला असेलच. तिची काय चूक होती? पुरात ज्यांचं नुकसान झालं, त्यांनी काय पाप केलं होतं? कुणाच्या चुकीची शिक्षा कुणाला मिळाली, याचा विचार आपण मत देताना करायला हवा का?

 

रातोरात धरण फुटलं - 

रत्नागिरीतलं तिवरे धरण फुटलं. रातोरात लोकं धरणाच्या पाण्यातून वाहून गेले. कुणाला दोष द्यायचा.. सरकारला, विरोधकांना की मग नियतीला? मत देताना आपण याचा विचार करणार आहोत का?

काहीही होतं, आपला माणूस कायमचा गायब होतो -

झाड पडतं. भिंत पडते. पूल पडतो. पूल वाहून जातो. बॅनर पडतो. फ्लेक्स पडतो. चेंगराचेंगरी होते. आग लागते. गॅसगळती होते. आपल्यात काल परवा हसत खेळत असणारा माणूस एकदम कायमचा आपल्यातून निघून जातो. आज आहे, उद्या आहे की नाही, याची शाश्वती नाही. आपल्या जगण्याची शाश्वती आपल्या मतदानात दिसायला हवी का? आपण याचा विचार करायला हवा का? 

महाडचा सावित्री पूल, सीएसएमटीचा फूट ओव्हर ब्रीज, एल्फिन्स्टनची चेंगराचेंगरी, पुण्यात सिग्नलवेळी पडलेला बॅनर, आग लागल्याच्या असंख्य घटना, झाड पडल्याचा शेकडो दुर्घटना, आपण विसरलो आहोत का? आपण मतदान करताना हे सगळं विसरुन तर जाणारा नाही आहोत ना?

मत तुम्ही कुणालाही द्या. मत द्या. पण त्याआधी या सगळ्याचा विचार करायचा की नाही, याचाही एकदा विचार करा.

WebTitte: You can vote for anyone! But before that, are we going to think about these things?


संबंधित बातम्या

Saam TV Live