महावितरणच्या इतिहासातील सर्वात दुर्मिळ चोरी, वाचाल तर...

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 मार्च 2020

विजेच्या चोरीच्या बऱ्याच बातम्या आपण पाहिल्या असतील पण ही बातमी वाचाल तर तुम्हीही थक्क व्हाल...

नवी मुंबई - श्‍वानांसाठी चोरीच्या वीजेवर वातानुकूलित यंत्रणा(AC) चालवण्याचा प्रकार नेरूळ येथे उघड झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून वीज चोरी करणाऱ्या ग्राहकाकडून महावितरणने तब्बल सात लाख रूपयांचा दंड वसूल केला आहे. महावितरणच्या इतिहासात वीज चोरीच्या पकडलेल्या अनेक कारवायांपैकी ही सर्वात दुर्मिळ वीजचोरीची घटना असल्याची चर्चा रंगली आहे.

नेरूळ सेक्‍टर 1 येथील ट्‌वीनलॅंड टॉवरमध्ये एका घरात विदेशी जातीचे श्‍वान पाळले जात आहेत. या श्‍वानांना सतत थंड वातावरण हवे असल्याने त्यांच्या मालकाने सोसायटीच्या मीटर रूममधील एका मीटर मधून वायर थेट स्वतःच्या घरात टाकून वीज चोरी सुरु होती. या चोरलेल्या वीजेवर त्या घरातील चार AC 24 तास सुरु असायचे.

 

हेही वाचा- ...अन् 5 वर्षांनी कुत्रा परतला स्वगृही !

 

गेल्या अनेक महिन्यांपासून या श्‍वान मालकाचा सदर प्रकार सुरू होता. अखेर या वीज चोरीच्या माहिती एका इसमाला समजल्यानंतर त्याने महावितरणच्या भांडूप नागरी परीमंडळाच्या कार्यालयाला या वीज चोरीची माहिती दिली. या गोपनिय माहितीवरून महावितरणच्या वाशी मंडळाचे अधिक्षक राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता सिंहाजीराव गायकवाड आणि पामबीच उपविभाग पथकाने ट्विन टॉवर सोसायटीत जाऊन कारवाई केली.

 

या प्रकरणात श्‍वानांच्या मालकाने महावितरणची तब्बल 34 हजार 464 युनिट वीज चोरी केली असल्याचे कबूल केले. महावितरणने त्या मालकाकडून वीज चोरी प्रकरणी सात लाख रूपयांचा दंड वसूल केला आहे. पाळीव प्राण्यांसाठी अशा प्रकारे उच्चभ्रु वस्तीमध्ये वीज चोरी केल्याची पहिलीच घटना घडल्यामुळे परिसरात चर्चा रंगली आहे. नागरीकांनी अशा प्रकारे वीज चोरी करू नये असं आवाहन महावितरणच्या भांडूप परीमंडळाचे मुख्य अभियंता पूष्पा चव्हाण यांनी केली आहे.  

WEB TITLE- You have never seen such theft...


संबंधित बातम्या

Saam TV Live