
>> रुपाली बडवे
Mumbai News : पोटदुखीमुळे वर्षभर त्रस्त असलेल्या ५२ वर्षीय महिलेच्या पोटातून डॉक्टरांनी ११ किलो वजनाची 'फायब्रॉइड' गाठ यशस्वीरित्या काढली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तज्ञ वैद्यकीय मंडळींनी यशस्वीपणे ही शस्त्रक्रिया केली आहे.
ही महिला पोटदुखीमुळे वर्षभरापेक्षा अधिक काळापासून त्रस्त होती. यामुळे तिला झोप घेणे देखील अवघड झाले होते. अखेर ती रुग्णालयात दाखल झाली. तिच्या शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी तब्बल ११ किलो वजनाची फायब्रॉइड म्हणजेच गर्भाशयाच्या मांसपेशींपासून तयार झालेली गाठ काढली आहे.
इतक्या जास्त वजनाचे फायब्रॉइड असणे हा दुर्मिळ प्रकार असून त्यामुळे शस्त्रक्रिया देखील गुंतागुंतीची आणि अतिशय अवघड होती. मात्र उपनगरीय रुग्णालयांमध्ये सुरू झालेल्या डीएनबी वैद्यकीय अभ्यासक्रमामुळे आणि उपलब्ध अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामुग्रीमुळे ही शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान महानगरपालिकेच्या वैद्यकीय तज्ञांनी यशस्वीपणे पेलले.
यासंदर्भात माहिती देताना राजावाडी रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, सुमारे ५२ वर्षे वय असणारी एक महिला रजोनिवृत्तीनंतरची पोटदुखीची तक्रार घेऊन घाटकोपर स्थित महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयाच्या बाहयरुग्ण विभागात आली. तेथे स्त्री-रोगतज्ञ डॉ. स्वाधीना मोहंती यांनी सदर रुग्णाची वैद्यकीय तपासणी केली तेव्हा तिच्या पोटाचे आकारमान प्रमाणापेक्षा वाढल्याचे आढळले. (Mumbai News)
त्यामुळे लागलीच सोनोग्राफी आणि एमआरआय तपासणी करण्यात आली. त्यात असे निदर्शनास आले की गर्भाशयात खूप मोठे फायब्रॉइड आहे आणि त्यामुळे रक्तवाहिन्या, आतडी आणि मूत्राशय विस्थापित झाले होते. फायब्रॉइड ही गर्भाशयाच्या मांसपेशींपासून तयार झालेली एक प्रकारची गाठ असते. शरीरातील स्त्री हार्मोन्समधील बदलामुळे अशा प्रकारच्या गाठी होतात.
परिणामी रुग्णाला वेगवेगळ्या शारीरिक आरोग्य समस्या जाणवत होत्या. रुग्णाचा रक्तगट देखील दुर्मिळ आरएच निगेटिव्ह होता. तसेच रक्तक्षय आणि हायपोथायरॉईडचा आजार देखील जडला होता. सदर आजार आणि त्यातून उद्भवणाऱ्या इतर समस्यांमुळे संबंधित रुग्णाला मागील वर्षभरापासून पुरेशी झोप घेता येणे देखील शक्य होत नव्हते.
सर्व वैद्यकीय तपासणी आणि अहवालांचे अभ्यास करून झाल्यानंतर राजावडी रुग्णालयाच्या वैद्यकीय चमुने त्या महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि ही जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली.
शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ आणि शस्त्रक्रियागार कर्मचारी यांनी त्यासाठी अथक परिश्रम घेतले. स्त्रीरोग विभागातील वरिष्ठ डी.एन.बी. शिक्षक डॉ. स्वाधीना मोहंती, कनिष्ठ डी.एन.बी शिक्षक डॉ. शालिनी, वरिष्ठ प्रबंधक डॉ. पायल, भूलतज्ञ विभागातील ज्येष्ठ डी.एन.बी शिक्षक डॉ. रिना, वरिष्ठ प्रबंधक डॉ. अविनाश, शस्त्रक्रियागार विभागातील परिचारिका श्रीमती सोनाली आणि इतर कर्मचारी यांच्या चमूने ह्यात आपापली भूमिका तत्परतेने निभावली. (Latest Marathi News)
ही शस्त्रक्रिया करीत असताना मोठ्या रक्तवाहिन्या सुरक्षित करण्यासाठी तसेच मूत्रवाहिनी आणि मूत्राशय हे दोन्ही सुरक्षित राखण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आणि कौशल्य पणाला लावून वैद्यकीय तज्ञांनी शस्त्रक्रिया पूर्ण केली. परिणामी शस्त्रक्रिये दरम्यान रक्तस्त्राव अपेक्षेपेक्षा कमी झाला आणि रुग्णाच्या जीवाला कोणताही धोका पोहोचला नाही.
रुग्ण महिला शस्त्रक्रियेनतंर उपचार घेवून पूर्णपणे बरी झाली आहे. या महिलेने शस्त्रक्रियेनंतर सांगितले की त्यांना आता पोटात खूप हलके आणि एकूणच छान वाटत आहे. पोटाच्या गाठीतील वजनामुळे आणि त्यातून होणाऱ्या त्रासामुळे गेल्या वर्षभरात पुरेशी झोप घेता आली नव्हती. आता पूर्णपणे बरे झाल्यानंतर झोप पुरेशी लागत आहे आणि आयुष्य पुन्हा आनंदी झाले असल्याचे देखील या रुग्णाने सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये डी.एन.बी. अभ्यासक्रम सुरू केल्याने आणि प्रशासनाच्या सर्व सहकार्यामुळे अशा स्वरूपाच्या क्लिष्ट, जोखमीच्या तसेच दुर्मिळ शस्त्रक्रिया उपनगरीय रुग्णालयांमध्येच सुरक्षितपणे करणे आता शक्य झाले आहे. परिणामी रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्याची गरज न पडता स्थानिक पातळीवर उत्कृष्ट वैद्यकीय उपचार मिळत आहेत असे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.